|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » एक अतूट नाते : वाजपेयी आणि डोंबिवली

एक अतूट नाते : वाजपेयी आणि डोंबिवली 

विवेकानंदांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

राजकारणावर नाही, स्वामी विवेकानंदांवर बोलेन

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे स्वामी विवेकानंद यांचे शिष्य होते आणि म्हणूनच तत्कालीन प्रदेश नेत्याचा विरोध असताना ते 31 डिसेंबर 1980 मध्ये डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते डोंबिवली नगरपालिकेच्या इमारतीवरील स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले, अशी आठवण माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी सांगितली.

डोंबिवली नगरपालिकेने पालिकेच्या इमारतीवर स्वामी विवेकानंद यांचा अर्धपुतळा बसवण्याचा उद्घाटन लोकसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांचे हस्ते करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. शिवसेनेचे माजी नगरसेवक ऍड. शशिकांत ठोसर यांनी याला अनुमोदन दिले होते. नगरपालिकेचा हा प्रस्ताव घेऊन मी पक्षाच्या प्रदेश नेत्यांकडे गेलो व अटल बिहारी वाजपेयी यांना डोंबिवलीत आणण्यासाठी विनंती केली. त्यावेळच्या एका प्रदेश नेत्याने याला विरोध केला. वाजपेयींना तुम्ही लहान समजता का? असा सवाल विचारला. तेवढय़ात तेथे वेदप्रकाश गोयल (रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे वडील) तेथे आले व त्यांनी आपण वाजपेयींना भेटू असे सांगितले. त्यानंतर आम्ही दिल्लीत गेलो व वाजपेयींना आमंत्रण दिले, अशी पटवारी यांनी आठवण सांगितली.

भेटीवेळी वाजपेयी यांनी एकूण किती खर्च केला, पुतळा कसा आहे, बजेट किती असे विचारून अवास्तव खर्च केला नाही ना, असा सवाल विचारला. मगच डोंबिवलीत येण्याचे मान्य केले. मात्र मी राजकारणावर बोलणार नाही. मी येणार तो केवळ स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून. फक्त त्यांच्याबद्दलच बोलीन अशी अट घातली होती. त्याप्रमाणे ते आले आणि त्यांनी 45 मिनिटे स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलच भाषण केले.

डोबिवली इतिहास ग्रंथामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण 1966 मध्ये झाल्याची नोंद आहे, असे वाजपेयी यांचे अतूट नाते डोंबिवलीशी होते, अशी आठवण पटवारी यांनी बोलून दाखवली.

Related posts: