|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » लुडो प्रेमींचा लोकलमध्ये सुळसुळाट

लुडो प्रेमींचा लोकलमध्ये सुळसुळाट 

लोकलमध्ये घोळक्याने लुडो खेळणाऱया प्रवाशांचा इतर प्रवाशांना त्रास

रेल्वेच्या मध्य मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकल गाडय़ा अपुऱया पडत असल्याने सकाळी व सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी लोकलमध्ये होते. यामुळे अनेकदा प्रवाशांमध्ये धक्का लागल्याने वाद-विवादासारखे प्रसंग देखील ओढवतात. असे असताना देखील यात भर घालण्यासाठी हल्ली हवसे, नवसे प्रवासी घोळक्याने लुडो गेम खेळत असल्याने इतर प्रवाशांना उभे राहण्यासाठी देखील जागा देत नसून त्यांचा हा घोळका इतर प्रवाशांनी सरकण्यास सांगितले तरी दादागिरी, शिवीगाळ करीत मारहाण सुद्धा करत असल्याने कोणीही या घोळक्याच्या नादाला न लागण्यातच धन्यता मानतात. हा लुडो गेमचा प्रकार सध्या लांब पल्याच्या लोकलमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. यांच्यावर आवर घाला असा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

बाल वयात आपण सर्वजण खेळतो असा हा लुडो गेम म्हणजे सापशिडीतील एक प्रकार पण चौघात खेळला जाणारा हा गेम सध्या कागदी पुटय़ावर नव्हे तर थेट मोबाईलमध्ये उपलब्ध असल्याने प्रवासी रोज लोकलमधून प्रवास करताना चारöचार जणांच्या घोळक्याने एकत्र उभे राहून तसेच सीट वर बेशिस्तपणे बसून लुडो गेम खेळतात. या खेळणाऱया प्रवाशांची संख्या मध्य मार्गावरील कर्जत, खोपोली, आंबरनाथ, टिटवाळा, आसनगाव आदी लांब पल्यांच्या गाडय़ांमध्ये दिवसेंदिवस वाढीला लागली आहे. यावर रेल्वे प्रशासनाने उपाययोजना अथवा प्रवाशांना त्रास देणाऱया या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करावी असा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

रेल्वेच्या मध्य मार्गवरील लांब पल्यांच्या गाडय़ांची संख्या कमी असल्याने प्रवाशांची तुफान गर्दी सकाळी व सायंकाळी लोकलमध्ये दिसते. दिवसा आड गर्दीमुळे प्रवासी लोकलमधून पडल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. असे असतानाही प्रवासा दरम्यान गेम खेळणे म्हणजे प्रवाशांमध्ये इतर प्रवाशांच्या प्रति संवेदना, माणुसकी राहिलेली नाही अश्या प्रवाशांवर पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ नागरिक प्रवासी अशोक जगताप

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी वापरात येणारी लोकल आहे. यातून प्रवासादरम्यान लोकलमध्ये व्यक्तिक गेम खेळणे हा विरंगुळा आहे. मात्र, घोळक्याने गेम खेळून इतर प्रवाशांना जाणीवपूर्वक त्रास देणे अतिशय गंभीर बाब आहे. लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे बळी जाणाऱया प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अशा घोळके बाजांनवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून दंडनीय कारवाई करण्यात यायला हवी.

रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्ष अभीजित धुरत