|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात शांतता, एकता टिकवण्याची गरज

राज्यात शांतता, एकता टिकवण्याची गरज 

प्रतिनिधी /पणजी :

राज्यात शांतता आणि एकता टिकवून ठेवण्याची गरज आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेसाठी गोवा जगभर प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक आणि जातीय सलोख्यासाठीही गोवा प्रसिद्ध आहे. या शुभदिनी राज्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आपण शपथ घेऊया, असे प्रतिपादन गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजीत जुन्या सचिवालयाजवळ 72 व्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण केल्यानंतर सभापती डॉ. सांवत बोलत होते.

  राज्यात मोठय़ा उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय तिरंगा फडकाविला. त्यानंतर संचलनाची पाहणी केली. यावेळी सभापतीनी उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस अधीक्षक दिनराज आर. गोवेकर आणि निवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश गावकर, पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, आणि पोलीस कॉन्स्टेबल जुबेर मोमीन यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

राज्यातील स्वच्छतेचे महत्त्व तसेच तो आपल्या मुक्त प्रणालीचा एक भाग आहे. निरोगी वातावरण निर्मितीसाठी राज्य सरकार स्वच्छ भारत, नितळ गोय हे अभियान लक्षात ठेवून प्रयत्न करण्यात येत आहेत. प्लास्टिक वापरावर बंदी आणण्यासाठी आणि कचरा समस्या सोडविण्यासाठी कचऱयाची योग्य तऱहेने विल्हेवाट लावण्यासाठी पाऊल उचलले आहे. पर्यावरणाच्या जतनासाठी सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून सभापती सावंत यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षानी गोव्याला मुक्ती मिळाली असली तरी राज्याने आरोग्य, शिक्षण, पर्यटन, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच पायाभूत विकासात भरीव प्रगती साधली आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची आठवण त्यांनी करून दिली.