|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जिथे माणूस हरवतो

जिथे माणूस हरवतो 

(स्किझोफ्रिनिया)

नाही हाकारा, पण उठले रान

घरटे सापडेना वाट

बेभान पाखरू, समजेना कोणा

का कल्लोळ कल्लोळ

अभिनेता अतुल कुलाकर्णीची ही कविता ‘देवराई’ या चित्रपटातली. स्किझोफ्रिनियाबद्दल भाष्य करणारा मानसिक आरोग्य क्षेत्रातला हा मराठीतला एक पहिलाच प्रयोग होता. या चित्रपटाचे सल्लागार सुप्रसिद्ध मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी होते. ‘देवराई’ या सिनेमाचा नायक शेष हा स्किझोफ्रिनिक असतो. आधी नॉर्मल असणारा शेष हळूहळू मानसिक आजारात जास्त गुरफटला जातो. शेषला लहानपणापासून देवराईचे प्रचंड वेड असते. जसा हा आजार सुरू होतो तसे त्याला देवराईचे भास होत राहतात. सतत होणाऱया भासांनी आणि कानात ऐकू येणाऱया आवाजांनी आपल्या डोक्मयात काहीतरी होत आहे असे त्याला वाटत राहते. सुरुवातीचे त्याचे आनंदी उत्साही असणे, बहिणीवर असलेला जीव, नंतर त्याचा हळूहळू वाढत जाणारा एकलकोंडेपणा, गर्दीत मिसळताना वाटणारी अकारण भीती किंवा अवघडलेपण, कधीकधी त्याचे हिंसक होणे तर कधी त्याचे गोंधळलेपण अशी स्किझोफ्रिनियाची लक्षणे दाखवणारी व्यक्तिरेखा शेष या पात्रातून अतिशय जिवंतपणे उभी राहते.

तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला आहात का, की जिला इतर कोणालाही ऐकू न येणारे ‘आवाज ऐकू येतात’? अशा तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका कारण कदाचित तिला/त्याला स्किझोफ्रिनियाचा त्रास होत असेल. मनोविकारामध्ये स्किझोफ्रिनिया हा एक भयानक विकार आहे. कुठल्याही देशातल्या, वंशातल्या जातीतल्या किंवा धर्मातल्या माणसांना तो होऊ शकतो.

स्किझोफ्रिनिया म्हणजे काय?

स्किझोफ्रिनिया म्हणजे मेंदूचा विकार होय. यामुळे मेंदू आपले काम नीट करत नाही. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि संकल्पनांमध्ये बाधा येऊ शकते. स्किझोफ्रिनिया ही एक गंभीर मनोविकृती आहे. तिची नीट ओळख करून घेऊ. स्किझोफ्रिनियाचे पॅरॅनॉईड, कॅटॉटॉनिक, डिसऑरगनाइड आणि रेसिडय़ुअल असे चार प्रकार मानले जातात.

हा आजार कोणाला होतो?

स्किझोफ्रिनियाचे प्रमाण एपिलेप्सी एवढेच आहे. स्किझोफ्रिनिया हा बहुधा 15 ते 45 वर्षे वयात जडणारा विकार आहे. त्याची सुरुवात हळूहळू कळत नकळत होते. काही बिघडत आहे हे नातेवाईकांच्या फार उशिरा लक्षात येते.

स्किझोफ्रिनियाची लक्षणे

स्किझोफ्रिनिया झाला आहे हे कसे ओळखावे? त्याची पाच मुख्य लक्षणे आहेत.

?एक म्हणजे सतत भ्रम होणे (डिल्युजन्स) यामध्ये ज्या गोष्टी खऱया नसतात अशा गोष्टींवर त्या व्यक्तीचा विश्वास बसतो आणि लोक त्यांचे विचार ओळखत आहेत असे वाटत राहते.

?दुसरे लक्षण म्हणजे सतत आभास होणे (हॅल्युसिनेशन) यामध्ये दुसऱया कोणालाही न दिसणाऱया, ऐकू येणाऱया व न जाणवणाऱया गोष्टी त्या व्यक्तीला दिसतात. ऐकू येतात व जाणवतात.

?तिसरे लक्षण म्हणजे विसकळीत आणि असंबद्ध बोलणे आणि लिहिणे.

?चौथे लक्षण वागणुकीत ढळढळीत विचित्रपणा दिसणे, विचित्र शारीरिक हालचाली करणे.

?पाचवे लक्षण म्हणजे नकारात्मक विचार.

या लक्षणामुळे व्यक्तीचा वास्तवापासून संपर्क बिघडतो वा तुटतो. वरील लक्षणापैकी कुठलीही दोन लक्षणे खूप तीव्रपणे सतत सहा महिने दिसून आली तर त्याला ‘स्किझोफ्रिनिया’ म्हणतात. या विकारातील प्रत्येक केस ही इतरांपेक्षा वेगळी असते.

स्किझोफ्रिनिया निदान व उपचार

स्किझोफ्रिनियाचे निदान वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय इतिहासावर तसेच शारीरिक तपासणी, वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय तपासण्या आणि चाचण्यांवर आधारित असते. स्किझोफ्रिनियावर इलाज होऊ शकतो. मनोविकृती विरोधी (ऍटिसायकॉटिक) औषधांमुळे रुग्णांमध्ये असलेली मनोविकाराची लक्षणे कमी होण्यास मदत होते. आणि स्थिर झालेल्या रुग्णांमध्ये विकार उलटण्याची शक्मयता परिणामकारकरित्या टाळता येते. औषधांखेरीजचे उपचार म्हणजे रुग्णाला आणि कुटुंबाला शिक्षण देणे. म्हणून स्किझोफ्रिनियाचे निदान लवकर होऊन उपचार झाल्यास त्यामुळे पुढे होणाऱया गुंतागुंती टाळता येऊ शकतात. लवकर इलाजाने बरेच लोक स्किझोफ्रिनियापासून मुक्त होऊन सामान्य जीवन जगू शकतात.

                          देखरेख करणाऱया व्यक्तीचे काम

डॉ. आनंद नाडकर्णी (मनोविकारतज्ञ) आणि डॉ. शुभा थत्ते यांनी स्किझोफ्रिनिया या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला एक छान नाव दिले, ते म्हणजे ‘शुभार्थी’ आणि आजारी व्यक्तीची जे काळजी घेतात त्या व्यक्तींना ‘शुभंकर’ असे संबोधले जाते. तसेच शुभंकर व्यक्तीची मुख्य जबाबदारी असते तिने रुग्णांच्या आजारावरील उपचार पद्धती समजून घेऊन त्या वेळेवर देण्याची जबाबदारी घ्यावी.

रुग्णाबरोबर नीट बोला व उपचार करणाऱयाचे विचारही जाणून घ्या

स्किझोफ्रिनियाच्या रुग्णांशी आदराने, मदतीच्या भावनेने आणि दयाळूपणे वागणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. एके काळी स्किझोफ्रिनिया झालेला माणूस ‘कामातून गेला’ असे समजले जायचे. गेल्या काही वर्षात उपचारांमध्ये फार प्रगती झाली आहे. गरज आहे ती रुग्णांचे कुटुंबीय, मित्र, सहकारी यांनी हा आजार वेळेवर ओळखण्याची व चिकाटीने उपचार करण्याची. स्किझोफ्रिनिया नंतरही जीवन आहे.

                                                                                                       -रेश्मा भाईप,

            क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट,

            जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, सिंधुदुर्ग

Related posts: