|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तब्बल 1225 लिटर गावठी दारू जप्त

तब्बल 1225 लिटर गावठी दारू जप्त 

रामपूर येथे पोलिसांची कारवाई

गुहागरातून चिपळुणकडे सुरू होती वाहतूक, गाडीसह 2 लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त,

बेकायदेशीर दारू वाहतूकप्रकरणी तरूण ताब्यात

 

वार्ताहर /मार्गताम्हाने

गुहागर ते चिपळूण अशी गावठी दारूची वाहतूक करणाऱया तरूणाला शुक्रवारी चिपळुण तालुक्यातील रामपूर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी 2 च्या सुमारस करण्यात आलेल्या या कारवाईत 63 हजार 350 रूपयांची 1225 लिटर गावठी दारू व 2 लाख रूपयांची महिंद्रा मॅक्स गाडी जप्त करण्यात आली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर गावठी दारू सापडल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे.

अमर अंकुश मयेकर (33, वालोपे-गणेशवाडी) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. अमर मॅक्स गाडीतून गुहागर येथून गावठी दारूची वाहतूक करीत होता. ही गाडी रामपूर बसस्थानकाच्या बाजूला उभी करून ठेवलेली सागर सुधाकर साळवी यांना दिसली. त्यांना या गाडीचा संशय आल्याने त्यांनी याची माहिती रामपूर पोलीस क्षेत्राला दिली.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता या गाडीत प्रत्येकी 35 लिटर दारूचे 35 कॅन सापडले. तातडीने पोलिसांनी अमर याला ताब्यात घेत या दारूसाठय़ासह महिंद्रा मॅक्स गाडी जप्त केली. हेड कॉन्स्टेबल उदय भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

काही वर्षांपूर्वी वालोपे येथील दारू व्यावसायिकांनी पत्रकारांना मारहाण केल्यावर पत्रकारांनी उभारलेल्या आंदोलनानंतर येथील दारूधंद्यांना चाप बसला आहे. त्यामुळे व्यावसायिक आता गुहागर येथून दारू आणत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. दरम्याना इतक्या मोठय़ा प्रमाणावर सापडलेली ही दारू गुहागरात नेमकी कुठे तयार होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरील दारू भट्टय़ा गुहागरात कार्यरत असतील तर त्याची कल्पना प्रशासनाला कशी नाही किंवा प्रशासन जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत होते का असे प्रश्न या निमित्ताने उपलस्थित झाले आहे.