|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुठ्ठाळीतील वाहतूक कोंडीची सरकारकडून दखल

कुठ्ठाळीतील वाहतूक कोंडीची सरकारकडून दखल 

अमेरिकेतून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अधिकाऱयांच्या टीमने केली पाहणी

प्रतिनिधी/ पणजी

कुठ्ठाळी जंक्शनवर होणाऱया रोजच्या वाहतूक कोंडीची दखल अखेर सरकारने घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेतून सूचना केल्यानंतरच सरकारी यंत्रणा कार्यान्वित झाली. राज्याचे मुख्यसचिव, पोलीस महासंचालक, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव, वाहतूक अधिकारी आणि साबांखाच्या अधिकाऱयांचा समावेश असलेल्या एका टीमने शुक्रवारी कुठ्ठाळी आणि आगशी या दोन्ही भागात जाऊन पाहणी केली व वाहतूक कोंडीच्या कारणांचा आढावा घेतला.

या भागातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने काही निर्णय यावेळी घेण्यात आले. कुठ्ठाळी जंक्शनपासून मडगावच्या दिशेने स्लीप वे तयार करुन वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला हे काम हाती घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. आता ताबडतोब हे काम हाती घेतले जाणार आहे. पाहणी करण्यासाठी गेलेल्या टीमने या भागात पाहणी करुन वाहतुकीत कुठे अडथळे येतात, कोणत्या भागात वाहतुकीची कोंडी होते याची पाहणी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात व कोणती कामे हाती घ्यायला हवी यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरच अधिकारी झाले जागे

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत आपल्या तब्येतीचा आढावा घेण्यासाठी गेले आहेत. पर्रीकर गोव्याबाहेर असले तरी गोव्यातील दैनंदिन घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे.  इंटरनेटद्वारे ते गोव्यातील वृत्तपत्रांचे वाचन करतात. गेले काही दिवस कुठ्ठाळीतील सततच्या मेगा ब्लॉकमुळे वृत्तपत्रातून मोठी टीका होत आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाने कुठ्ठाळीत आंदोलनही केले. याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन अधिकाऱयांना आवश्यक त्या सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतरच सरकारी यंत्रणा कामाला लागली. तोपर्यंत कोणीही जनतेला भेडसावत असलेल्या समस्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते.

पुलाचे बांधकम व रस्त्यांवर खड्डे

प्रमुख रस्त्यावर चाललेल्या कामामुळे वाहतुकीत अडथळा होत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ामुळे वाहनांची गती कमी होते व त्याचे परिणाम म्हणून वाहतूक कोंडी होते. यावर उपाययोजना करण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आयआरबीच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहे. शिस्तीत वाहने हाकण्याच्या दृष्टीने आता पोलीस अधिकारी सूचना देणार आहेत.

उत्तर आणि दक्षिण गोव्याचे पोलीस उपअधिक्षक आणि पोलीस निरीक्षक हे समन्वय साधून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक सुरळीत करणे यावर भर देणार आहेत. वेर्णा पोलीस निरीक्षक, आगशी पोलीस निरीक्षक यांचेही नियंत्रण राहाणार आहे. या भागात वाहन तपासणी नाके ठेवले जाणार नाहीत. वाहन मध्येच ब्रेकडाऊन झाले किंवा अपघात झाल्यास त्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येणार आहे.

वाहन धारकांनी सोसल्या हालअपेष्ठा

गेले काही दिवस कुठ्ठाळी भागातून पणजी आणि मडगावच्या दिशेने प्रवास करणाऱया वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. तीन, चार तास वाहतूक कोंडीत अडकण्याचे प्रकार रोजचेच झाले होते, मात्र सरकारच्या कोणत्याही संबंधित यंत्रणेने त्याची दखल घेतली नाही. दक्षिणेतून पणजीत प्रवास करणाऱया अनेक शासकीय अधिकाऱयांनी याचा अनुभव घेतला पण उपाययोजनेबाबत कोणतेही प्रयत्न केले नाही.

लोकप्रतिनिधीनीही केले दुर्लक्ष

कुठ्ठाळी मार्गे पणजीत येणाऱया आणि पुन्हा दक्षिण गोव्यात जाणाऱया लोकप्रतिनिधीनी तर या समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष केले. दक्षिण गोव्यातून पणजीत येणाऱयांमध्ये नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह अन्य दक्षिणेतील आमदार या भागातून रोज प्रवास करायचे मात्र त्यांनीही या समस्येकडे गांभिर्याने पाहिले नाही. अखेर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आदेश द्यावे लागले.