|Monday, November 19, 2018
You are here: Home » क्रिडा » दिवंगत आईसाठी जिंकायचेय सुवर्णपदक!

दिवंगत आईसाठी जिंकायचेय सुवर्णपदक! 

आईच्या निधनाने उदध्वस्त झालेल्या, पण, त्यातून सावरत नव्याने सराव सुरु केलेल्या नौकानयनपटू दत्तू बबन भोकनाळला यंदा आशियाई स्पर्धेत आपल्या आईसाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. दत्तू भोकनाळ सिंगल स्कल्स सुवर्ण जिंकण्यासाठी फेवरीट आहे. शिवाय, नौकानयनातील भारताचे 34 जणांचे पथक बरीच पदके जिंकू शकेल, असा होरा आहे. भारतीय संघ नौकानयनातील 7 इव्हेंट्समध्ये सहभागी होत असून तांत्रिक संचालक निकोलय जिओगा यांनी संघातील प्रत्येकाकडून कसून तयारी करवून घेतली आहे.

‘नौकानयनात सर्व काही वाऱयाचा वेग व दिशा यावर अवलंबून असते. पुण्यात सर्व काही उत्तम होते. पण, इथे वारा कसा असेल, हे पहावे लागेल. त्यामुळे, आपण किती वेळ नोंदवू, हे आताच सांगणे कठीण आहे’, असे लष्करी सेवेत असलेल्या भोकनाळने स्पष्ट केले. यापूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दत्तू भोकनाळ सहभागी होत असताना त्याची आई आजाराशी झुंजत होती. नंतर त्याच वर्षात त्याच्या आईचे निधन झाले. 27 वर्षीय दत्तूने त्यानंतर बराच कालावधी रोईंग बोटीला स्पर्शही केला नव्हता. पण, नंतर रोमानियाचे निकोलय संचालकपदी रुजू झाले आणि त्यांनी भारतीय नौकानयनपटूंकडून दुपटीने सराव करुन घेतला. पूर्वी भारतीय नौकानयनपटू साधारणपणे 20 किलोमीटर्सचा सराव करायचे. पण, ते आता 36 ते 40 किमी अंतर कापून सराव करतात. सध्या भारतीय पथक आशियाई स्पर्धेत सहभागी झाले असले तरी आपले मुख्य लक्ष्य ऑलिम्पिकचे असेल, असे निकोलय यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related posts: