|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाघवाडी फाटय़ानजीक अपघातात दोघे जागीच ठार

वाघवाडी फाटय़ानजीक अपघातात दोघे जागीच ठार 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

पुणे-बेंगलोर दुतगती मार्गावर वाघवाडी फाटय़ाजवळील पाटबंधारे कार्यालयानजीक उभ्या असणाऱया कंटेनर ट्रकला पाठीमागून आयशर टेम्पोची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात टेम्पो मधील दोघेजण जागीच ठार झाले. तर टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात शनिवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास झाला. मृत व जखमी बेळगाव जिल्हयातील आहेत.

शहाहुसेन शब्बीर शेख (26, रा. चिक्कोडी), सोहेल दस्तगीर मुरगुडे (24, रा. खानापूर, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर महमंदसल्लाउद्दीन सरदार देसाई (39, रा. मेहबूबनगर, ता. चिक्कोडी) असे जखमी टेम्पो चालकाचे नाव आहे. शेख व मुरगुडे हे मावसभाऊ आहेत. आयशर टेम्पो सौ. दिलशाद शब्बीर शेख यांच्या मालकीचा आहे. या टेम्पो क्रमांक एम.एच.48 टी. 5642 मधून मुंबईहून बेळगावला मालवाहतूक केली जाते. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास देसाई हे मालभरुन घेऊन बेळगावकडे चालले होते. दरम्यान मालक शब्बीर यांचा मुलगा शहाहुसेन व त्याचा मावसभाऊ सुहेल हे टेम्पोमध्ये त्यांच्या समवेत होते. ते दोघेही क्लिनर बाजूस बसले होते.

पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो पेठनाका सोडून वाघवाडी फाटयाजवळ आला. यावेळी पाऊस सुरु होता. दरम्यान, रस्त्याच्या डाव्याबाजूच्या लेनवर कंटेनर ट्रक उभा होता. या ट्रकला पार्किंग लाईट व रिफ्लेटर लावले नव्हते.  आयशेर टॅम्पो चालक देसाई यांना हा ट्रक अचानक दिसल्याने त्यांनी जोराचा ब्रेक मारला. पण, टेम्पो घसरत जावून पुढे थांबलेल्या कंटेनरवर धडकला. यामध्ये आयशर टेम्पोचे मोठे नुकसान झाले. केबीन दबल्याने आतील कुणालाही बाहेर पडता आले  नाही. या धडकेनंतर समोरील कंटेनर चालकाने कंटेनरसह कोल्हापूर दिशेने पोबारा केला. पाऊस असल्याने व कंटेनरचे नंबर प्लेटवर चिखल उडाल्याने त्याचा नंबरही देसाई यांना दिसला नाही.

या अपघातात डाव्या बाजूच्या सिटवर बसलेले शेख व मुरगुडे गंभीर जखमी झाले. त्यांना वेळीच मदत कार्य मिळू न शकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शब्बीर शेख हे मुंबई वरुन बसने चिक्कोडीकडे येत होते. त्यांना चालक देसाई यांनी फोनवरुन अपघाताची कल्पना दिली. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी मृतांचे नातेवाईक ही आले. पोलिसांनी देसाई यांना बाहेर काढले. त्याचप्रमाणे दोन्ही मृतदेही बाहेर काढले. देसाई यांच्या हनुवटीवर तसेच डाव्या पायास किरकोळ खरचटले आहे. या प्रकरणी देसाई यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली.

Related posts: