|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली घाटामार्ग धोकादायक

आंबोली घाटामार्ग धोकादायक 

शिवराम दळवी यांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधले

वार्ताहर / सावंतवाडी:

सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ले-बेळगाव रस्त्यावर आंबोली हे पर्यटनक्षेत्र येते. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा हा घाटमार्ग दुवा आहे. त्यामुळे हा घाटरस्ता असुरक्षित असून धोकादायक बनला आहे. त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी आमदार शिवराम दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांकडे केली.

या घाटमार्गावर गेल्या दोन महिन्यात वाहने दरीत पडून जीवितहानी झाली आहे. त्यामुळे घाटमार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यांची ही दयनीय स्थिती पाहता अनेक नागरिक व पर्यटकांनी आपल्याकडे घाटमार्गाची व्यथा मांडली.

आपण आंबोली भागात तीस वर्षाहून अधिक काळ ये-जा करत आहे. मला स्वत:लाही या घाटमार्गाच्या व्यथेतून, मृत्यूच्या सापळय़ातून ये-जा करावी लागत आहे. अनेकवेळा घाटमार्गाबाबत व पर्यायी मार्गाबाबत संबधित खात्याशी पत्रव्यवहार केला. तरी त्यातून काही निष्पन्न झालेले नाही.

अलिकडे पोलादपूर येथील आंबेनळी घाटात बस कोसळून तीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली असून याला जबाबदार बांधकाम विभाग आहे. अशीच अवस्था आंबोली घाटमार्गाची आहे. घाटात संरक्षक कठडय़ाजवळ रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दरीत गाडी कोसळण्याचा धोका उत्पन्न होतो. त्यामुळे व्यक्तिश: संरक्षक कठडे व रिफ्लेक्टर याकडे जातीनिशी लक्ष देऊन गैरसोय दूर करावी, अशी मागणी दळवी यांनी केली आहे.