|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विस्मरणांत परम व्याकुळता

विस्मरणांत परम व्याकुळता 

भगवंताचे अंतर्धान पावणे आणि गोपिकांची व्याकुळता याबद्दल स्वामी तेजोमयानंदजी सुंदर विवेचन करतात ते असे-गोपिकांना जेव्हा भगवान दिसेनासे झाले, तेव्हा त्या व्याकुळ झाल्या. देवषी नारदांनी पण आपल्या सुप्रसिद्ध भक्तीसुत्रांत भक्तिची व्याख्या करताना म्हटले आहे- नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता  तद्विस्मरणे परमव्याकुलतेति । त्या भगवंतांना पूर्णपणे अर्पित होत्या. भगवंतांचे दर्शन झाले नाही म्हणून त्या व्याकुळ होऊन गेल्या. जीवनामध्ये आपलेही स्वरूप झाकले जाते, तेव्हा आपल्यालाही व्याकुळता जाणवू लागते. परंतु आपल्यामध्ये आणि गोपिकांमध्ये फार मोठा फरक आहे. भगवंतांचे दर्शन होत नाही म्हणून त्यांना व्याकुळता वाटत होती हे त्यांच्या लक्षात आले. पण आम्हाला मात्र समजून येत नाही. आम्ही लोक आमचाच अभिमान पुष्ट करण्यामध्ये मग्न असतो. हाच तर फरक अज्ञानी आणि भक्तामध्ये, अज्ञानी आणि ज्ञान्यामध्ये असतो. भक्ताला, ज्ञान्याला त्वरित कळून येते की ‘अहं’ आला आहे म्हणून माझे स्वरूप झाकले गेले आहे तेव्हा त्या अहंला दूर केले पाहिजे. आता ह्या सर्व गोपिका भगवंताचे दर्शन करू इच्छित होत्या. त्या भगवंतांना शोधू लागल्या. त्या गोपिका झाडा झुडपांना, लता वृक्षांना भगवंताचा पत्ता विचारू लागल्या. त्यांनी पहिल्यांदा पृच्छा केली, मग शोध करू लागल्या आणि शेवटी भगवंतांच्या लीला करू लागल्या. भगवंतांनी जितक्मया लीला केल्या त्या सर्वांचे स्मरण करीत त्या गोपिका तशा प्रकारचा अभिनय करू लागल्या. तेव्हा त्यांच्या वृत्ती तन्मय होऊन गेल्या.

येथे साधनेची सर्व रहस्ये उलगडून दाखविली जात आहेत. आम्हालाही जर कधी अशा प्रकारचे विस्मरण झाले तर भगवंतांच्या सगुण लीलांचे स्मरण केले पाहिजे. मन, वचन आणि कर्माने स्मरण करता करता भाव बनू लागतो. हेच वेदांताच्या भाषेत, देहाध्यास दूर करा; अशाप्रकारे सांगितले जाते. देहाध्यास दूर करायचा ह्याचा अर्थ-हा देह म्हणजे मी नाही, इंद्रिये मी नाही, प्राण मी नाही, मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा अभ्यास करा. वेदांतामध्ये ध्यानाभ्यास करण्यास सांगितले गेले आहे. जेव्हा कधी आपल्या स्वरूपावर आवरण येते तेव्हा- मनोब द्ध्यहंकारचित्तानि नाहं-असा विचार करावा. हा निर्गुणाचा अभ्यास आहे.

याने काय होते हे तुकाराम महाराज सांगतात –

देह नव्हे मी हे सरे । उरला उरे विठ्ठल  । ।

सगुणाच्या उपासकाने काय करावे? जो रामभक्त असेल त्याने रामलीलांचे आणि जो कृष्णभक्त असेल त्याने कृष्णलीलांचे स्मरण करावे. येथे गोपिकाही तशाच प्रकारचे चिंतन, स्मरण, अभिनय करू लागल्या, कृष्णासारख्या बोलू लागल्या. हेच याचे सार आहे. संत हेच तर सातत्याने करतात. तुकाराम महाराज म्हणतात –

गुण गाईन आवडी । हेची माझी सर्व जोडी  । । दिनरजनी हाची धंदा । गोविंदाचे पवाडे  । । अखंड भगवंताचे नाम, रूप, गुण, चरित्र यांचे चिंतन करत राहावे म्हणजे त्याचा विसर पडण्याची भीती राहणार नाही. आणि कदाचित विसर पडलाच तर पुन्हा अखंड हरिचिंतनाची कास धरावी, हाच उपाय आहे.

ऍड. देवदत्त परुळेकर