|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दाभोलकरांचा मारेकरी

दाभोलकरांचा मारेकरी 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला(एटीएस) अखेर यश आले आहे. एटीएस पथकाने औरंगाबाद येथून सचिन अंदुरेला अटक केली असून आता दाभोलकरांचाच नव्हे तर पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश वगैरेपर्यंतच्या सर्व हत्यांचे कोडे उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘देर है, अंधेर नही’ असेच या निमित्ताने म्हणावे लागेल. गुन्हा किंवा अघोरी कृत्य कितीही सावधगिरीने आणि दडवून केले तरी ते उघडकीस येते आणि गुन्हेगार जेव्हा सरावतो आणि पुनः पुन्हा गुन्हे करतो तेव्हा तो निश्चित सापडतो. हे तपासातील जगमान्य तथ्य आहे. हेच तथ्य इथेही समोर आले आहे. डॉ.दाभोलकर यांची हत्या करणारा सचिन अंदुरे जेरबंद झाला आहे. आता पोलीस त्याला बोलते करतील आणि या व अशा हत्यांमागील विकृती व कट यांचा शोध घेत मुळापर्यंत पोहोचतील यात शंका नाही. एखादा गुन्हा किंवा हत्या घडल्यानंतर खरेतर त्यांचा तातडीने तपास होऊन गुन्हेगाराला शिक्षा व्हायला हवी पण, तसे झाले नाही किंवा गुन्हेगारापर्यंत तातडीने पोहोचणे पोलिसांना अशक्य झाले. तपास व कारवाई रेंगाळली, त्यामध्ये राजकारण घुसले तर गुन्हेगार सोकावतो व गुन्हे करत सुटतो. गुन्हेगाराचे वारंवारचे गुन्हे त्याला चुका करायला भाग पाडतात व तो पकडला जातो. या प्रकरणातही तसेच झाले आहे. खरेतर गुन्हेगार लगेचच पकडला गेला असता तर बरे झाले असते, पुढच्या हत्या टळल्या असत्या. मुळात कोणत्याही धर्मात खून, हत्या, हिंसाचार शिकवला जात नाही. त्याचे समर्थन केले जात नाही. अशा गोष्टींना अधर्म असेच म्हटले जाते. हिंदू धर्मात तर नाहीच नाही. ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’ असे आपले मागणे असते आणि ‘दुरितांचे तिमिर जावो’ अशी प्रार्थना असते. पण वेगवेगळय़ा धर्मातील अतिरेकी धर्माच्या, देवांच्या, श्रद्धांच्या नावाखाली आपली दुकाने चालवतात, जगभर दहशतवाद माजवतात, अतिरेकी कारवाया करतात आणि निष्पाप लोकांचे बळी घेऊन स्वतःची पोटे भरतात आणि काही अतिरेकी दहशतवादी संघटना त्यांना आपले हेतू साध्य करण्यासाठी वापरत असतात. दुर्दैवाने अशा प्रकारात अज्ञानापोटी अंधश्रद्धेने अनेक चांगल्या घरातले, व्यवसायातले आणि मोठे शिक्षण घेतलेले लोक सहभागी होतात. नरेंद्र दाभोलकर यांनी आपले अवघे आयुष्य अंधश्रद्धेच्या विरोधात जागर घालण्यासाठी खर्च केले. डॉ. दाभोलकरांच्या पाठोपाठ 20 फेबुवारी 2015 ला प्रा. गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात आणि 30 ऑगस्ट 2015 रोजी डॉ. एम. एस. कलबुर्गी यांची कर्नाटकात हत्या झाली. 5 सप्टेंबरला गौरी लंकेश यांची हत्या झाली. सगळय़ा हत्यांमध्ये अनेक धागे समान होते. पण आरोपी मोकाट होते. पण योगायोग असा 20 ऑगस्टला डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली जो दिवस देशभर राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा होतो. त्या 20 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला एटीएसने सचिन अंदुरेला अटक केली आणि या हत्येमागचे गूढ आता उघड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंदुरेला लगेचच अटक झाली असती तर कदाचित पुढच्या हत्या झाल्या नसत्या पण पोलिसांना आरोपीपर्यंत पोचायला 5 वर्षे लागली. पण पोलीस अखेर गुन्हेगारापर्यंत पोहोचले. इतकी दिरंगाई चांगली नाही. पण यंत्रणा गुन्हेगारापर्यंत पोहोचली या घटनेचे स्वागत करायला हवे. विचारांची लढाई विचाराने करावी लागते. बंदुकीने नव्हे. हे या निमित्ताने सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. डॉ. दाभोलकर विज्ञानवादी होते. प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागत होते. कोणतीही अंधश्रद्धा, चमत्कार मानत नव्हते. त्यांची हत्या झाली पण त्यांचा विचार संपला नाही. राज्य सरकारने जादूटोणा विरोधी कायदा केला आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला सर्वत्र बळ आले. गेल्या आठवडय़ात मुंबईजवळ नालासोपारा येथे भंडार आळीत एटीएसने छापा टाकला. तेथे वैभव राऊत याच्याकडून काही शस्त्रे व स्फोटके जप्त करण्यात आली. तो आगामी सण आणि उत्सवात धमाके उडवणार होता. या वैभवचे शरद कळस्कर व सुधन्वा गोंधळकर असे सहकारी एटीएसने अटक केले आणि कसून तपास केला तेव्हा सचिन अंदुरेचे नाव पुढे आले. या सचिन अंदुरेने गोळय़ा झाडल्या होत्या हे या निमित्ताने स्पष्ट झाले आणि या हत्येच्या तपासावरचा पडदा हटला. या प्रकरणात सारंग अकोलकरही आहे पण तो अजून मिळालेला नाही. पोलिसांनी अंदुरेला औरंगाबादमध्ये अटक केली, जालन्यातही एकाला ताब्यात घेतले आहे. हा अंदुरे एका कापड दुकानात नोकरी करत असे आणि त्याला पत्नी व दोन मुले आहेत. त्याचे नालासोपारा कनेक्शन आहे हे तपासात स्पष्ट झाले आहे.एटीएसच्या हाती गोळय़ा घालणारा आणि स्फोटके बाळगणारे आरोपी असल्याने या तपासाला गती तर आली आहेच, पण संभाव्य अनर्थही टळला आहे. तपासात आता पानसरे, कलबुर्गी वगैरे हत्यांचीही उकल होते का आणि या वैभव, सचिन, शरद, सुधन्वा यांच्यामागे कुणाची शक्ती आणि  पाठराखण आहे हे बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. एटीएस पथकाला या कामात यश आणि सर्वांचे सहकार्य लाभेल असे वाटते. तसे झाले तर धर्माच्या नावाखाली वेगवेगळय़ा धर्मात सुरू असलेला अधर्म आणि अंधश्रद्धा यांचा बुरखा फाटेल आणि जनसामान्यांच्या  हितांचा विज्ञानवादी दृष्टीकोन बळावेल. कायद्याचे राज्य आहे हा विश्वास अधोरेखित होईल. एटीएसच्या कारवाईवर काही मंडळी पत्रकबाजी, निदर्शने करत आहेत. लोकशाहीत लोकांना अनेक अधिकार असतात, कर्तव्ये असतात, धार्मिक स्वातंत्र्य असते, पण पोलिसांना पोलिसांचे काम करू द्यावे, कायदा कुणालाही हाती घ्यायचे दुःसाहस होता कामा नये. अशा प्रकरणात राज्यकर्त्यांनी राजधर्माचे पालन केले पाहिजे. खऱया अर्थाने धर्माचे, न्यायाचे मानवकल्याणाचे पाऊल उचलले गेले पाहिजे.

Related posts: