|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आयएस समर्थकाची भारतात पाठवणी

आयएस समर्थकाची भारतात पाठवणी 

वृत्तसंस्था/ दुबई

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेबद्दल सहानुभूती बाळगल्याच्या संशयावरून संयुक्त अरब अमिरातने (युएई) एका काश्मिरी युवकाला परत पाठविल्याची माहिती. अधिकाऱयांनी रविवारी दिली. श्रीनगरचा रहिवासी 36 वर्षीय इरफान अहमद जारगारवर ही कारवाई झाली. इरफानला 14 ऑगस्ट रोजी भारतात पाठविण्यात आले. मायदेशी परतल्यावर जम्मू-काश्मीर पोलिसांनी इरफानची चौकशी केली आहे.

अभियंता असणारा इरफान समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रिय असायचा, याचबरोबर इस्लामिक स्टेटशी संबंधित पोस्ट्सना तो पसंती द्यायचा. दहशतवादी संघटनेच्या क्रूर कृत्यांना त्यांना योग्य ठरविले होते. एनआयएने जारगारची दोन दिवसांपर्यंत चौकशी केली आहे. 28 एप्रिल रोजी ओमान येथून आखाती देशात घुसण्याचा प्रयत्न करताना इरफानला अटक झाली होती.

दुबई पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. समाजमाध्यम खाती पडताळत आयएसला समर्थन दर्शविण्याच्या प्रकाराबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आले. इरफानच्या कुटुंबाने विदेशमंत्र्यांना मदतीचे आवाहन केले
होते. स्वराज यांनी दूतावासाला या प्रकरणाची माहिती घेण्याचे निर्देश दिले होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत इरफानला सोडले जाऊ शकत नसल्याचे दुबई प्रशासनाने स्पष्ट केले होते.

 दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती दर्शविण्याप्रकरणी मायदेशी पाठविण्यात आलेला जारगार हा तिसरा काश्मिरी युवक आहे.