|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मौजे वडगांवमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन

मौजे वडगांवमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन 

वार्ताहर/ पुलाची शिरोली

मौजे वडगाव (ता.हातकणंगले) येथील गायरानमधिल गट क्रमांक 512 मध्ये मोठय़ा प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे. शासनाचा महसूल चुकवून सूरू असणार्या बेकायदेशीर उत्खननाकडे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा शासकीय कर बुडवून बेकायदेशीर गौण खनिजाची लूट करणार्या टोळीवर कारवाईची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

मौजे वडगावला सुमारे 135 एकरची गायरान जमीन आहे. याच गायरानमधील काही जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र रिकाम्या जागेत रात्रीची वेळ साधून मुरुमाचे उत्खनन व वाहतुक चालते. शासनाचा कर बुडविण्यासाठी सुट्टीचा दिवस तसेच मध्यरात्री किंवा पहाटेची वेळ साधून गौण खनिजाची लुट करण्याची शक्कल लढविली जात आहे. त्यामूळे गायरान जमीनीची अक्षरशः चाळण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी यांचे गौण खनिजाच्या चोरटय़ा वाहतूकीकडे  दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या या कारभाराविषयी ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यकत होत आहे.

या उत्खननातून गावाच्या विकासाला एक रुपयाही मिळत नाही. महसूल न भरता मुरुमाची चोरटी वाहतूक करणारे मात्र गब्बर झाले आहेत. महसूल विभागाने यामध्ये लक्ष घालून बेकायदेशीर गौण खनिजाची होत असलेली लूट थांबवावी.  अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Related posts: