|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दूधगंगा नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी सोडणाऱयांवर कारवाई करा

दूधगंगा नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी सोडणाऱयांवर कारवाई करा 

प्रतिनिधी/ सरवडे

काळमावाडी परिसरात वाळू आणि खडी तयार करण्याचे क्रेशर बसवले असून वाळू धुण्यासाठी केमिकल चा वापर केला जात आहे तेच केमिकलयुक्त पाणी दूधगंगा नदीत सोडले जात असल्याने गेल्या दोन वर्षापासून दुधगंगा काठावरील गावातील पिण्याचे पाणी प्रदूषित होत आहे. यामुळे रूग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. तहसीलदार आणि प्रांतांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी कोणतीच कार्यवाही केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाणी प्रदूषण करणाऱयांवर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध गावच्या नागरीकांनी दिला आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार शिल्पा ओसवाल यांना देण्यात आले आहे.

राधानगरी तालुक्यात गेल्या 2 वर्षापासून दूधगंगा नदीच्या पात्रात आणि काळमावाडी धरणा शेजारी राजापूर, धाउरवाडा, ऐनी, फराळे या गावाच्या हदीत विनापरवाना उत्खनन करून त्यातील वाळू धुण्यासाठी केमिकलचा वापर करून केमिकल मिश्रित पाणी दूधगंगा नदी पात्रात सोडले जात आहे. यामुळे दूधगंगा नदीचे पाणी केमिकल मिश्रित होत आहे. परिणामी आरोग्याचे गंभीर प्रश्न नदीकाठावरील ग्रामस्थांना अदभवत आहेत. या संदर्भात राधानगरीचे तहसीलदार, प्रांताधिकारी आणि  प्रदूषण महामंडळ यांच्याकडे लेखी तक्रार करून सुद्धा त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने दूधगंगा नदी काठावरील विविध गावातील सरपंच ,ग्रामस्थ शनिवारी राधानगरी तहसील कार्यालयासमोर जमले आणि तहसीलदर शिल्पा ओसवाल यांना नदी प्रदूषण कारणाऱयांवर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे अशी मागणी सोळांकूर चे सरपंच आर.वाय. पाटील यांनी केली.

यावेळी त्यांनी काळम्मावाडी धारणा शेजारी दूधगंगा नदी काठावर दोन वर्षापासून उत्खनन करून केमिकल टाकून वाळू धुतली जाते याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. यामुळे दुषित पाणी पिऊन गंभीर आजार उदभवत आहेत असे कृत्य करणाऱयांवर कठोर कारवाई करावी अन्यथा 21 ऑगस्ट रोजी क्रेशरच्या मशनरी बंद पाडून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात तहसीलदार ओसवाल यांनी नदी प्रदूषण होणाऱया ठिकाणी चौकशी सुरु असून दोषी आढळल्यास कार्यवाही केली जाईल असे सांगितले.  

 यावेळी आर. वाय. पाटील, पं. स. सदस्या सोनाली पाटील, शिवाजी चौगले, मनोज्ञा मोरे, अजित देसाई, भिकाजी एकल, संभाजी भोईटे, सुवर्णा बरगे, अशोक नायकवडे, दत्ता राऊत, राजाराम पाटील, वाय डी पाटील, आनंदा पाटील, जे. के. पाटील, प्रकाश पाटील, यांच्यासह सरवडे, कासारपुतळे, तुरंबे, सोळांकूर, नरतवडे, सुळबी, पनोरी, लिंगाचीवाडी, सावर्डे पाटणकर, ढेंगेवाडी, पंडेवाडी, आटेगाव, ऐनी आदी ग्रामपंचायतीचे सरपंच, विविध संस्थांचे चेअरमन, ग्रामस्थ मोठय़ा संखेने उपस्थित होते.