|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संततधारेने पिकांसह जनजीवन गारठले !

संततधारेने पिकांसह जनजीवन गारठले ! 

अतिपावसाने पिकांसह घरांचेही नुकसान

विजय पाटील / सरवडे

सुरूवातीपासूनच दमदार हजेरी लावलेल्या पावसाने या वर्षी संततधार कायम ठेवल्याने राधानगरी तालुक्यात अधिक पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके कुजण्याच्या मार्गावर असून नदीकाठच्या पिकांना यापुर्वीच धोका पोहचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने तसेच धरणे देखील तुडूंब होवू लागल्याने दक्षता म्हणून काळम्मावाडी व राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग दूधगंगा व भोगावती नदी पात्रात अनेकवेळा केल्याने नदीकाठची पिके अनेक दिवस पाण्याखाली आहेत. जोराचा वारा व वातारणातील गारठय़ाने मुले व माणसे आजारी पडत आहेत. बदललेल्या थंड हवामानाचा सर्वांनाच त्रास होत असून ग्रामीण जनजीवन गारठून गेले आहे.

राधानगरी तालुक्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. यावर्षी पावसाने सुरूवात चांगली केली.त्यामुळे धूळवाफ पेरणी केलेली पिके चांगल्या पध्दतीने उगून आली. तालुक्याच्या अनेक भागात भाताची रोप लागण असते. या रोपलागणीसाठीही पावसाचा चांगला उपयोग झाला. मात्र पावसाची संततधार कायम राहिल्याने उगवण झालेल्या पिकांची वाढ हव्या तितक्या जोमात होवू शकली नाही. शिवाय पावसाने उघडीप न दिल्याने शेतकऱयांना भांगलणीची कामे करताना व्यत्तय येवू लागला. माळरानातील पिकांची सततच्या पावसाने वाढ खुंटली तर पाणथळीच्या ठिकाणी असणारी पिके सततच्या पाण्याने धोक्यात आली. जोरदार पावसामुळे यावर्षी धरणांचा पाणीसाठाही झपाटय़ाने वाढत गेला. धरणांची पाणी पातळी वाढू लागल्यानंतर काळम्मावाडी व राधानगरी, तुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग दूधगंगा, भोगावती व तुळशी नदी पात्रात केला जावू लागला. पाण्याचा विसर्ग अधिक असल्याने तसेच पावसाचे सातत्य कायम असल्याने पाणी नदीपात्राबाहेर पडले. पात्राबाहेर पडलेले पाणी अनेक दिवस नदीकाठच्या शेतात राहिल्याने त्याठिकाणच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. तर जोराचा वारा व पाऊस कायम राहिल्याने घराच्या भिंतीना धोका होवून अनेक घरे देखील पडली आहेत.

तालुक्यात सर्वाधिक पिक हे ऊसाचे असते. शेतकरी वर्गाने मोठय़ा कष्टाने हे पिक उन्हाळय़ात जपले होते. मात्र जून महिन्यापासून या पिकावर पावसाचा मारा असल्याने ऊसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. गळीत हंगाम तोंडावर आला तरी ऊसाची वाढ न झाल्याने शेतकऱयांना याचा मोठा फटका बसला आहे. तसेच उन्हाचे प्रमाण पुर्ण कमी झाल्याने ऊसावर विविध रोगांनी आक्रमण केले. सततच्या पावसामुळे रोगप्रतिबंधक फवारणी करणे देखील शेतकऱयांना अवघड बनले आहे. तर ऊसाचे क्षेत्र रोगांच्या विळख्यात सापडल्याने या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस अधिक झाल्याने ऊसाच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होणार आहे. तर अनेक शेतकऱयांचे ऊस तांबेरा, मावा आदी रोगांमुळे अस्तीत्वहिन झाले आहेत. कायम संकटात असणाऱया शेतकऱयाला या नवीन संकटाने अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

जोराच्या वाऱयाबरोबर पावसाची संततधार असल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. गढूळ पाणी व बदललेले वातावरण यामुळे लोकांना विविध साथीच्या आजारांशी सामना करावा लागत आहे. लहान मुले व वयोवृध्द माणसांना हा पावसाळा नकोसा झाला आहे. अनेक महिन्याचे पावसाचे सातत्य असल्याने लोक अक्षरशा कंटाळले असून कधी उघडीप पडणार याची प्रतिक्षा करीत आहेत.हवेतील गारठा व संततधार यामुळे घरातील वातावरणही गारेगार झाले असून लोक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. याचा परिणाम बाजारपेठातील विविध दुकानांवर होवू लागला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

            नुकसान भरपाईची मागणी

राधानगरी तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकावर करपा पडला आहे. तर भातासह खरिपाची अन्य पिके कुजली आहेत. महापुरामुळे नदीकाठावरील पिके कुजली आहेत. यामुळे शेतकरी पुर्णतः अडचणीत येणार असून शासनाने पिकांचे पंचनामे करून शेतकऱयांना नुकसान भरपाई दय़ावी अशी मागणी ठरावाद्वारे पंचायत समितीने मासीक सभेत केली आहे. तर यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने बहुतांशी पिकांना त्याचा धोका पोहचला असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी लोकप्रतिनिधी करीत आहेत.