|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केरळ पुरग्रस्तांना मदतीसाठी आवाहन

केरळ पुरग्रस्तांना मदतीसाठी आवाहन 

प्रतिनिधी/ मडगाव

दिवसांपासून केरळमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसांमुळे हाहाकार माजला असून केरळमधील लोकांना तातडीने मदत करण्याची गरज फातोर्डाचे माजी आमदार तथा भाजपचे प्रवक्ते दामू नाईक यांनी व्यक्त केली असून त्यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. गोव्यातील दानशूर व्यक्तींनी आपल्याला शक्य असले त्या प्रमाणे मदतीचा हात द्यावा असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.

इतर राज्यांनी जेव्हा जेव्हा वाईट परिस्थिती उद्भवली आहे, तेव्हा तेव्हा गोव्याने नेहमीच भरीव असा मदतीचा हात दिला आहे. या वेळी सुद्धा गोव्यातील जनता भरीव अशी मदत देईल अशी अपेक्षा दामू नाईक यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी गोव्यात कामा-धंद्यानिमित्त स्थायिक झालेले तसेच त्यांनी गोव्यात सुरू केलेल्या केरळ संघटनाचे पदाधिकारी साबू जॉर्ज, श्रीलाल (केरळा संघम), के. पी. राघवन व के. के. प्रेमानंदन (केरळा कला केंद्रम), शरदचंद्र (आय्याप्पा सेवा संघम), तसेच प्रेमजीत दशरथन (श्री दामबाबाले घोडे, फातोर्डा), राजेश राजन (जेसीआय गोवा) यांची उपस्थिती होती.

काल पासूनच मदतीचा ओघ सुरू

दरम्यान, काल दुपारी दामू नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले व त्या संदर्भातील माहिती सोशल मिडियावर टाकली व त्वरित मदतीचा ओघ सुरू झाला. काल रविवार दि. 19 ते शनिवार दि. 25 ऑगस्ट पर्यंतच लोकांकडून विविध स्वरूपातील मदत स्वीकारली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांनी मदत करताना शक्य तो चांदरी, चटई, घोंगडी, रात्रीच्यावेळी घालण्याजोगे कपडे, लुंगी, आंघोळीसाठी टॉवेल, बिस्किट (क्रीम बिस्किट नको), तांदुळ, साखर, मीठ, दूध पावडर, कडधान्य, गरम मसाले, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, चहा-कॉफी पावडर, डेटॉल, फस्ट एड किट, मच्छर रिपेलेंट्स, ऑडोमोस, ऍण्टी सेप्टीक लोशन, ऍण्टी फंगल पावडर, बेबी डायपर, एडल्ट डायपर, सेनिटरी नॅप्कीन, टूटपेस्ट, टूटब्रश, आंघोळीसाठी  डेटॉल साबण, मेणबत्त्या, आगपेटय़ा तसेच स्वयंपाक भांडी पुरवावी.