|Monday, July 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » देवदास, वल्ली आणि नमुने

देवदास, वल्ली आणि नमुने 

शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची देवदास ही कादंबरी अनेक भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. देवदास आणि पारो यांच्यातल्या प्रेमाची ही एक साधी दु:खांत कहाणी.  तिच्यावर अनेक चित्रपट निघाले. एका पिढीला सैगलचा देवदास आवडला. पुढच्या पिढीला दिलीपकुमारचा देवदास आवडला. समर्थ चित्रपटकारांनी हे चित्रपट बनवले आणि ते लोकांनी स्वीकारले. मात्र नंतर आलेला शाहरुख खानचा पोशाखी चित्रपट जाणकारांनी स्वीकारला नाही. ज्यांनी फक्त कादंबरी वाचली होती त्यांनी देखील स्वीकारला नाही. कारण मूळची एक साधी प्रेमकहाणी भडक आणि बटबटीत स्वरूपात पडद्यावर आली होती.

चांगल्या कथा-कादंबरीवरून बनलेल्या चित्रपटांची हीच पंचाईत असते. कारण कथा-कादंबरी वाचणाऱया प्रत्येक वाचकाच्या मनात नायकाची, नायिकेची आणि त्यातल्या उत्कट प्रसंगांची एक अबोध प्रतिमा निर्माण झालेली असते. पडद्यावर सिनेमा येतो तेव्हा त्यातल्या चित्राशी ती प्रतिमा जुळतेच असे नाही. 

पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधली पात्रे अशी वाचकांच्या मनात अजरामर झालेली आहेत. एकपात्री कथाकथन करताना त्यांचे बोलणे, त्यांचे आवाज पुलंनी आपल्या मनात कायमचे कोरून ठेवलेले आहेत. या सगळय़ा माणसांची चित्रे आणि आवाज आम्हा चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. पुलंच्या जन्मशताब्दीचे वर्ष चालू आहे. त्या निमित्त काही पुलंप्रेमींनी या व्यक्ती आणि वल्ली ‘नमुने’ नावाने हिंदी भाषेत पडद्यावर आणल्या आहेत.

खरं सांगायचं तर हे नमुने छान आहेत. बघायला मजा वाटते. त्यांनी केलेल्या विनोदावर माफक हसू येते. पण हे ऐश्वर्यसंपन्न नमुने पुलंच्या मध्यमवर्गीय व्यक्ती आणि वल्लीपासून ‘कोसो दूर’ आहेत. शाहरुखच्या भपकेबाज देवदासप्रमाणेच ते फसले आहेत.

या व्यक्तींना आणि वल्लीना हिंदीच्या परक्मया आणि भपकेबाज वातावरणात उगीच नेले असे वाटते. तिथे त्यांचे आत्मे आणि आम्हा वाचकांची मने देखील गुदमरताहेत. पुलंचा अंतु बर्वा म्हणतो, “चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकडय़ांनी आंबा घेतलाय एके काळी…’’ मालिका चकाचक करण्याच्या नादात या अंतूच्या तोंडी “चालीस साल पहले की बात है… वो जमाना था कि सौ सौ ट्रक भर के आम एक्स्पोर्ट किये हैं,’’ वगैरेची कल्पनाच करवत नाही.

कालाय तस्मै नमः