|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अतिउत्साही नवज्योतसिंग सिद्धू !

अतिउत्साही नवज्योतसिंग सिद्धू ! 

सारा देश अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने दुःखसागरात बुडालेला असताना पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथग्रहण समारंभाला इस्लामाबाद येथे सहभागी होतात काय आणि पाकव्याप्त काश्मीरच्या प्रमुखांशेजारी बसतात काय! एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला आलिंगन देतात काय! पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर तिथे मिळालेला मान-सन्मान पाहता नवज्योतसिंग सिद्धू विरघळले. इम्रान खान व पाकिस्तानी नेत्यांबद्दलचे त्यांचे प्रेम उफाळून आले. भारताच्या पंतप्रधानांसह देशातील अनेक दिग्गजांनी पाकचे निमंत्रण स्वीकारलेले नाही. सिद्धू यांना मात्र आपली दोस्ती आठवली. दोस्तीच्या बदल्यात ते देशही विसरले. नवज्योतसिंग सिद्धू सध्या अडचणीत आलेले आहेत. करायला गेलो एक आणि झाले भलतेच, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. आजवर पाकिस्तानने भारतविरोधी केलेल्या कारवाया भारतीय जनता कधीही विसरू शकत नाही. पंजाब हा पाकिस्तानच्या शेजारचा प्रांत. फाळणीपासून आजवर पंजाबने बरेच काही सहन केलेले आहे. आजही पंजाबमध्ये पाकिस्तानच्या कारवाया चालूच आहेत. मोठय़ा प्रमाणात पंजाबमध्ये अमली पदार्थ पोहोचवून त्यातून युवा शक्तीला बिघडवण्याचा विडा पाकिस्तानने उचललेला आहे. शिख जनतेत फूट पाडून खलिस्तान चळवळही सुरू करण्यासाठी पाकनेच इंधन ओतलेले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक नामवंत क्रिकेटपटू तसेच राजकीय नेत्यांनीदेखील जायचे टाळले आणि सिद्धूला मात्र देशापुढे आपली मैत्री मोठी वाटली. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी सिद्धूला मान दिला असेल कारण भारतातून गेलेला हा तसा एकमेव लक्षात राहण्यासारखा नेता होता. पाकिस्तानमध्ये शपथग्रहण समारंभानंतर पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना सिद्धूने दिलेले आलिंगन सिद्धूला अडचणीत आणणारे ठरले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांत आणि राजकारणामध्येदेखील सिद्धूवर जोरदार टीका होत आहे. खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धूवर कडाडून टीका केली आहे. आपल्याला या मंत्र्याकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती, असे ते म्हणतात. पाकव्याप्त काश्मिरच्या राष्ट्रपतींबरोबर सिद्धू बसले इथपर्यंत सारे ठीक होते. परंतु भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून दररोज होणारे हल्ले आणि आपले सैनिक दररोज मरण पावत असताना सिद्धूने पाकच्या लष्करप्रमुखांना दिलेले आलिंगन निश्चितच आक्षेपार्ह आहे. या प्रकाराने काँग्रेस पक्ष आणि कॅ. अमरिंदरसिंग यांचे सरकारही पंजाबात टीकेचे धनी बनले आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे वैयक्तिक पातळीवर इस्लामाबादला गेले. जेव्हा एखाद्या राज्याचा कॅबिनेट मंत्री विदेशात जातो त्यावेळी केंद्र सरकारची परवानगी हवी की नको? केंद्रीय गृहमंत्रालयाची रीतसर परवानगी सिद्धू यांनी घेतली होती काय? या साऱया प्रश्नांना सिद्धू आता समाधानकारक उत्तरे देऊ शकतील असे वाटत नाही. या देशातले कोणीही शपथग्रहण समारंभाला जात नाही, अशा वेळी आपण अतिउत्साहीपणा दाखविण्याची गरज नाही हे तरी सिद्धू यांच्या लक्षात यायला हवे होते. देशभरात सिद्धूच्या विरोधात संतापाची लाट उसळते आहे आणि सिद्धू पाक दौऱयाचे लंगडे समर्थन करीत आहे. भारत सरकार वा पंजाब सरकारने सिद्धूला अद्याप जाब विचारलेला नाही. परंतु बिहारच्या मुझफ्फरनगर येथील एका व्यक्तीने सिद्धूवर राजद्रोहाचा खटला घातला आहे. या खटल्यातून काही निष्पन्न होणार नाही. परंतु अकारण सिद्धू अतिउत्साहापोटी मांस खाऊनच राहिलेला नाही तर गळय़ात हाड बांधले आहे. अतिउत्साहीपणा नडतो तो असा. भारतातून इतर नेतेमंडळी का गेली नाही याचा तरी सिद्धूने विचार करायला पाहिजे होता. मुळात सिद्धू हा तसा राजकारणी नाही. क्रिकेटमधून तो राजकारणात पोहोचला व वाक्प्रचूर असलेल्या या व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आहे. उत्कृष्ट वक्तृत्वाद्वारे त्याने पंजाबमधील अनेकांची मने जिंकली. मात्र पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देऊन जिंकलेली मनेही सिद्धूने तोडलेली आहेत. खरे पाहता काँग्रेसने सिद्धूवर कारवाई करण्याची गरज होती. मध्यंतरी काँग्रेसमधील आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मोदी सरकारविरोधात गरळ ओकली. हे करताना त्यांनी भारत सरकारच्या विरोधात निवेदने केली. काँग्रेसने केवळ डोळे वटारले. थोडे दिवस त्यांना निलंबित केले व आता निलंबन मागे घेण्याचे ठरविले आहे. काँग्रेस पक्ष याबाबतीत गंभीर आहे की नाही? सिद्धूने अकारण आपल्यावर संकट ओढवून घेतले आहे. पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देऊन सिद्धूने नेमके काय मिळवले? तो राष्ट्रीय नेता बनला की आंतरराष्ट्रीय नेता? उलटपक्षी आज तमाम देशवासियांच्या पोटी तो खलनायक ठरलेला आहे. पाक लष्कर प्रमुखाला आलिंगन देण्यापूर्वी सिद्धूने भारताच्या सीमेवर पाककडून होणारा स्वैर गोळीबार आणि त्यात वीरमरण पत्करणाऱया भारतीय जवानांचा तरी विचार करणे गरजेचे होते. एका वकिलाने पंजाबच्या या मंत्र्याविरोधात बिहार न्यायालयात ठोकलेल्या राजद्रोहाच्या खटल्यास सिद्धूला सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर जनतेलाही तोंड दाखविणे नकोसे होईल. अतिउत्साहीपणा हा असा नडतो. त्यामुळे कोणताही निर्णय स्वतःच्या मर्जीवर घेता येत नाही. कारण सिद्धू हे आता मंत्री आहेत. क्रिकेट खेळाडू नव्हे. जरी तो अद्याप दूरचित्रवाणीवर कॉमेंट्री देत असले तरीदेखील सिद्धू एका महत्त्वाच्या राजकीय पदावर आहेत. असे स्वैरपणे वागता येत नाही याची जाणीव आता या प्रकाराने निश्चितच त्याना होईल. मुळात पाकला जाण्याची घाई करण्यापूर्वी सिद्धूंनी जर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जरी विचारले असते वा त्यांचा सल्ला घेतला असता तरी बरे झाले असते. एकदा मंत्री बनले, घटनात्मक शपथ ग्रहण केल्यानंतर तुम्ही कुठेही गेलात तरी मंत्री या नात्यानेच तुमची ओळख ठरते. वैयक्तिक पातळीवर सिद्धू पाकला जाऊ कसा शकतो? मुळात सिद्धूने एक नवा वाद निर्माण करून भाजपच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे.