|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » म्हशींच्या मृत्यूबाबत दूग्धव्यवसायिकास नुकसान भरपाई द्या

म्हशींच्या मृत्यूबाबत दूग्धव्यवसायिकास नुकसान भरपाई द्या 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   न्यू पॅलेस येथील शिंदे मळ्यामध्ये उच्च दाबाची वीज वाहिनी म्हशीच्या अंगावर पडून दुग्धव्यावसायिक अमित इंगवले यांच्या सुमारे सहा लाख किमतीच्या पंढरपुरी गवळाट जातीच्या चार म्हशी शुक्रवारी जागीच ठार झाल्या होत्या. या घटनेमुळे इंगवले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून महावितरणने इंगवले यांना नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी युवा नेते ऋतुराज पाटील यांनी शनिवारी महावितरणचे अधिक्षक अभियंता शैलेंद्र राठोर यांच्याकडे केली. यावेळी जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन अधिक्षक अभियंत्यांनी दिले

न्यू पॅलेस परिसरातील इंगवले मळ्यात राहणाऱया अमित इंगवले यांचा कामगार शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे सर्व म्हशी घेऊन पोलो मैदानाजवळील मळ्यात चरायला घेऊन गेला होता. सकाळी अकरा वाजता शिंदे मळ्याजवळून परतत असताना उच्च दाबाची मुख्य विद्युत वाहिनीची तार म्हशीच्या अंगावर पडली. म्हैस ओरडत असल्याने इतर तीन म्हशी तिच्या जवळ गेल्या विद्युत पुरवठा सुरू असल्याने विजेच्या धक्क्याने त्या एकमेकांला चिकटून चार म्हशींचा जागीच मृत्यु झाला. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱया अमित इंगवले यांच्या एका म्हशीची किंमत एक लाख ते सव्वा लाखापर्यंत होती. यामुळे इंगवले यांचे सहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. इंगवले कुटुंबियांचा उदरनिर्वाह दुधावर चालत होता. मात्र या घटनेमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शनिवारी युवा नेते ऋतूराज पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने महावितरणचे अधिक्षक अभियंता शैलेंद्र राठोर व कार्यकारी अभियंता सुनिल माने यांची याबाबत भेट घेतली. यावेळी ऋतूराज पाटील यांनी म्हैशींच्या मृत्युमुळे इंगवले कुटुंबियांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितलें त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी केली. यावेळी अधिक्षक अभियंता राठोर यांनी जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात नगरसेवक मोहन सालपे, अनिल आदिक, पप्पू सरनाईक ,अमित इंगवले, विनायक पोवार, पवन साळोखे, सतीश भोसले, दिपक देवणे, गोटया माळी आदी उपस्थित होते.