|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मच्छीमार बोटीला जलसमाधी वेत्ये समुदातील दुर्घटना

मच्छीमार बोटीला जलसमाधी वेत्ये समुदातील दुर्घटना 

मालकासह सर्व 6 खलाशी सुखरूप

‘श्रीकृपा’च्या तांडेलाचे प्रसंगावधान

 

प्रतिनिधी /राजापूर

मासेमारीसाठी गेलेल्या महालक्ष्मी बोटीमध्ये पाणी घुसल्याने तिला जलसमाधी मिळाल्याची दुर्घटना राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्र किनाऱयाजवळ सोमवारी घडली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच लगतच्या श्रीकृपा बोटीवरील तांडेलाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे बोट मालकासह अन्य 6 खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. याप्रकरणी नाटे सागरी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

राजापूर तालुक्यातील तुळसुंदे गावातील नितीन सहदेव देवकर हे अनेक वर्षे मासेमारीचा व्यवसाय करतात. त्यांची ‘महालक्ष्मी’ ही मासेमारी नौका आयएनडी (एमएच 4 एमएम 789) सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास मच्छीमारीसाठी तुळसुंदे बंदरातून निघाली. यावेळी त्यांच्यासोबत जगदीश शांताराम शिरगांवकर, पुरूषोत्तम म्हादू नाटेकर, कुंदन गणपत आडिवरेकर, भिकाजी रामचंद्र आडिवरेकर, संजय हरी पावसकर, राम हिराजी खडपे (सर्व राहणार तुळसुंदे) हे खलाशी होते.

या बोटीद्वारे सकाळी 7 च्या सुमारास वेत्ये समुद्रकिनारी मासेमारी सुरू होती. त्यावेळी अन्य काही बोटीही त्या परिसरात मासेमारी करत होत्या. याचवेळी अचानक सोसाटय़ाचा वारा सुटल्याने नितीन देवकर यांच्या बोट हेलकावे खावू लागली. त्यांच्या बोटीची तळाची फळी तुटून नौकेत पाणी शिरू लागले. त्यामुळे त्यांची बोट पाण्यात बुडू लागली.

बोट पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच बोट मालक नितीन देवकर यांच्यासह सर्व खलाशांनी एकच आरडाओरडा केला. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच नजीकच असलेल्या ‘श्रीकृपा’ बोटीतील तांडेल योगेश सुर्वे यांनी आपली बोट घटनास्थळी वळवली. तांडेल सुर्वे यांनी आपल्या बोटीतील दोरी महालक्ष्मी बोटीच्या दिशेने फेकली. या दोरीला पकडून बोटमालक नितीन देवकर यांच्यासह त्या बोटीतील सर्व खलाशी श्रीकृपा बोटीमध्ये सुखरूप आले. त्याच बोटीतून त्यांना तुळसुंदे येथील घरी सोडण्यात आले.

बोटीवरील सर्व खलाशांना वाचवण्यात यश आले असले तरी ‘महालक्ष्मी’ बोटीला वाचविण्यात अपयश आले. महालक्ष्मी बोटीला काही वेळातच जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत देवकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र तरी त्यांच्यासह त्या बोटीतील सर्व खलाशी सुदैवाने सुखरूप घरी पोहाचल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

Related posts: