|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत

महापौरपदी भाजपाच्या संगीता खोत 

सांगली/ प्रतिनिधी

सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खोत यांनी काँग्रेस आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांचा तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत धीरज सूर्यवंशी यांनी काँगेस आघाडीच्या स्वाती पारधी यांचा सात मतांनी पराभव करीत विजय मिळविला. स्वाभिमानी विकास आघाडीचे विजय घाडगे यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तर अपक्ष उमेदवार गजानन मगदूम यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 41 जागा जिंकून महापालिकेची सत्ता हस्तगत केली आहे. तर काँग्रेस 20 व राष्ट्रवादीने 15 अशा 35 जागा जिंकल्या होत्या. स्वाभिमानी विकास आघाडीने एक तर एक अपक्ष या निवडणुकीत विजयी झाले होते. सोमवारी महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात या पदाच्या निवडीची विशेष सभा पार पडली. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी काम पाहिले. महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खोत व सविता मदने तर उपमहापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी व पांडुरंग कोरे यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. आघाडीकडून महापौरपदासाठी कॉंग्रेसच्या वर्षा निंबाळकर तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या स्वाती पारधी यांचे अर्ज दाखल केले होते.

 दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. संगीता खोत, सविता मदने व वर्षा निंबाळकर यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर अर्ज माघार घेण्यासाठी पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली. या मुदतीत सविता मदने यांनी माघार घेतली. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपच्या संगीता खोत व आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांच्यात लढत झाली. हातवर करून मतदान घेण्यात आले. भाजपाच्या 41 नगरसेवकांसह अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांनी मतदान केले. त्यामुळे खोत यांना 42 मते पडली. तर वर्षा निंबाळकर यांना 35 मते पडली. स्वाभिमानी विकास आघाडीचे विजय घाडगे तटस्थ राहिले. यात खोत यांनी निंबाळकर यांचा सात मतांनी पराभव केला. 

त्यानंतर उपामहापौरपदाची निवडणूक पार पडली. छाननीमध्ये भाजपचे धीरज सूर्यवंशी, पांडुरंग कोरे व आघाडीच्या स्वाती पारधी यांचे अर्ज वैध ठरले. अर्ज माघार घेण्यास मुदत देण्यात आली. त्यामध्ये पांडुरंग कोरे यांनी माघार घेतल्याने भाजपचे धीरज सूर्यवंशी व आघाडीच्या स्वाती पारधी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये सूर्यवंशी यांना 42 व पारधी यांना 35 मते पडली. अपक्ष उमेदवार गजानन मगदूम यांनी भाजपला पाठिंबा दिला. तर स्वाभिमानीचे विजय घाडगे तटस्थ राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी महापौरपदी संगीता खोत व उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड जाहीर केली. सहाय्यक अधिकारी म्हणून आयुक्त रवींद्र खेबुडकर व नगर सचिव के. सी. हळींगळे यांनी काम पाहिले.

स्वच्छ व पारदर्शक कारभार करू : संगीता खोत

महापौरपदासाठी भाजपच्या नेत्यांनी मला संधी दिली आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करत महापालिकेत स्वच्छ व पारदर्शक कारभार करू व दिलेल्या संधीचा उपयोग मनपा क्षेत्रातील  जनतेसाठी व्हावा, यासाठी प्रयत्न करू, मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून तिन्ही शहराचा समतोल विकास करू व एक वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलू, अशी ग्वाही यावेळी महापौर संगीता खोत यांनी निवडीनंतर दिली.

संधीच सोनं करू : धीरज सूर्यवंशी

उपमहापौरपदी काम करण्याची संधी नेत्यांनी दिली आहे. या संधीचे सोने करून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. जनतेने भाजपवर विश्वास टाकून सत्ता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त कारभार करू व मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर कोटींच्या निधीबद्दल सूर्यवंशी यांनी आभार मानले.

चौकट

निवड साधेपणाने

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने आठ दिवस शासकीय दुखवटा पाळण्यात आला आहे. यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीनंतरही आनंदोत्सव साजरा केला नाही. भाजपाच्या वतीने दि 27 रोजी स्टेशन चौक ते मनपा अशी विजयी मिरवणूक काढली जाणार आहे. यानंतर पदाधिकारी पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले.

आघाडीच्या सदस्यांकडून भाजपाची कोंडी

काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी विशेष सभेच्या सुरूवातीलाच आक्रमक भूमिका घेत भाजपा सदस्यांच्या गोवा सहलीवर निषेधाचे फलक दाखविले. माजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्या निधनानंतरही गोवा सहल यशस्वी करणाऱया नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात केली. शिवाय सभा सुरू होण्यापूर्वीच अटलबिहारी यांना श्रध्दांजलीसाठी आग्रह धरला. मंगेश चव्हाण, अतहर नायकवडी, अभिजित भोसले, फिरोज पठाण आदी सदस्यांच्या या भूमिकेने प्रशासनही कोडयात पडले. यामुळे भाजपाचे नवखे सदस्य चांगले गोंधळून गेले. शेवटी प्रशानाने परवानगी दिल्याने श्रध्दांजली वाहण्यात आली.