|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिडकल पाणी पुरवठा विद्युतपंप क्षमता वाढविण्यास दुसऱयांदा निविदा

हिडकल पाणी पुरवठा विद्युतपंप क्षमता वाढविण्यास दुसऱयांदा निविदा 

प्रतिनिधी/ बेळगाव

हिडकल जलाशयामधून शहराला पाणी पुरवठा करणाऱया विद्युतपंपांची क्षमता वाढविण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. याकरिता पाच कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. मात्र, तांत्रिक मुद्दय़ावर पाचही कंत्राटदार अपात्र ठरले असल्याने आता दुसऱयांदा निविदा मागविण्यात येणार आहेत. विद्युतपंपांची क्षमता वाढविण्यात आल्यास शहरातील पाण्याची समस्या कमी होणार आहे.

शहराला हिडकल जलाशयामधून सध्या 12 एमजीडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे. ही क्षमता 18 एमजीडीपर्यंत वाढविण्याची तरतूद हिडकल योजना राबविताना 2006 मध्ये करण्यात आली होती. पाणी पुरवठा क्षमता वाढविण्यासाठी विद्युतपंपांची क्षमता वाढविणे आणि जलवाहिन्या बदलण्यासाठी 32 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याकरिता प्रस्ताव तयार करून त्यावर महापालिका सभागृहात  ठराव मंजूर करण्यात आला होता.

हा प्रस्ताव राबविण्यासाठी 32 कोटी खर्च अपेक्षित आहे. याकरिता महापालिकेने  निधीची तरतूद केली आहे. हिडकल ते लक्ष्मी टेकडीदरम्यान चार ठिकाणी विद्युतपंप असून सध्या 12 एमजीडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता या पंपांची आहे. दररोज 9 एमजीडी पाणी उपसा केले जाते. ही क्षमता वाढविण्यासाठी विद्युत पंप बदलण्यासह आवश्यक ठिकाणी जलवाहिन्या बदलण्याची गरज आहे. प्रस्ताव राबविण्यासाठी एक वर्षाचा अवधी लागणार आहे. विद्युतपंपांची क्षमता वाढविण्यात आल्यास हिडकल जलाशयामधून दररोज 18 एमजीडी पाणी उपसा करता येणार आहे. यामुळे ही योजना शहरवासियांच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. पण विविध तांत्रिक कारणांमुळे विद्युत पंपांची क्षमता वाढविण्याचा प्रकल्प रखडला आहे.

हा प्रस्ताव 2014 पासून प्रलंबित असून त्यावेळी पाणी पुरवठा क्षमता वाढविण्यासाठी 22 कोटी निधीची आवश्यकता होती. पण आता प्रस्ताव 32 कोटीवर गेला असल्याने खर्चाची चाचपणी करण्यात यावी, अशी सूचना आमदार फिरोज सेठ यांनी केली. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्यादृष्टीने पाणी पुरवठा क्षमता वाढविण्याची गरज असल्याने प्रस्तावाला महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली होती. यानंतर पाणी पुरवठा मंडळाने निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेत पाच कंत्राटदारांनी भाग घेतला होता. पण तांत्रिकदृष्टय़ा सदर कंत्राटदार अपात्र ठरले आहेत. यामुळे पुन्हा दुसऱयांदा निविदा काढण्यात येणार आहेत.