|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आरक्षण निश्चित; आता तयारी निवडणुकीची

आरक्षण निश्चित; आता तयारी निवडणुकीची 

बेळगाव / प्रतिनिधी

महापालिकेचे वॉर्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर झाले आहे. याबाबतची अधिकृत प्रत महापालिकेला मिळाली आहे. काही विद्यमान नगरसेवकांचे वॉर्ड राखीव झाले आहेत. काही नगरसेवकांचे वॉर्ड खुले आहेत. यामुळे निवडणूक लढविण्याचा आराखडा आतापासूनच तयार करण्याच्या तयारीस इच्छुक लागले आहेत. यामुळे सर्वांनाच आता प्रतीक्षा आहे निवडणुकीच्या घोषणेची.

 अंतिम आरक्षणाची प्रत महापालिकेला उपलब्ध झाली नसल्याने आरक्षण यादीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण याबाबत अधिकृत प्रत उपलब्ध झाल्याने संभ्रम दूर झाला आहे. पण अपेक्षेप्रमाणे आरक्षण आले नसल्याने काही इच्छुक व आजी-माजी नगरसेवक न्यायालयात जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

महापालिका सभागृहाची मुदत फेब्रुवारीअखेर संपणार आहे. मुदत पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. दि. 29 ऑगस्ट रोजी राज्यातील 105 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. उर्वरित महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका घेण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. यापूर्वी तात्कालिक आरक्षण जाहीर करून आक्षेप मागविले होते. 58 वॉर्डांच्या आरक्षणाबाबत 72 आक्षेप नोंदविण्यात आले होते. आक्षेपानंतर 12 वॉर्डच्या आरक्षणात बदल झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या 105 स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत असल्याने उर्वरित महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीअखेर घेण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया ऑगस्टअखेर संपल्यानंतर बेळगावसह राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात येणार आहे. नव्याने वॉर्ड रचना करण्यात आल्याने नव्या रचनेनुसार मतदार याद्या तयार करणे आवश्यक आहे. तसेच वॉर्ड रचनेचे आराखडे तयार करण्याची गरज आहे. नव्या वॉर्ड रचनेनुसार मतदारांचे वॉर्ड बदलले आहेत. सलग्न असलेल्या दुसऱया वॉर्डमध्ये काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे मतदार यादी तयार करताना याची चाचपणी करणे आवश्यक आहे. सर्व माहिती घेऊन मतदार याद्या तयार करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. या कालावधीत मतदार याद्या तयार करणे, मतदारांची नावे दाखल करणे, कमी करणे आदींसह विविध प्रक्रिया निवडणूक विभागाला राबवावी लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्मयता आहे. सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर उर्वरित महापालिका निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. यामुळे महापालिकांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारीअखेर घेण्यात येतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

सध्या आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या चाचपणीस प्रारंभ झाला आहे. विद्यमान नगरसेवकांना निवडणूक लढविण्यास आरक्षणाचा अडथळा निर्माण झाल्याने अन्य वॉर्डात निवडणूक लढविता येते का? याचा कानोसा घेण्यास प्रारंभ केला आहे. काही नगरसेवकांनी आपल्या वॉर्डातील आरक्षण बदलून घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. तसेच जिल्हाधिकाऱयांकडे आक्षेपही नोंदविला. पण केवळ 12 वॉर्डचे आरक्षण बदलले आहेत. वॉर्ड क्रमांक 1, 3, 5, 14, 17, 18, 19, 21, 28, 29, 42 आणि 57 या वॉर्डचे आरक्षण आक्षेपानंतर बदलण्यात आले आहे.

Related posts: