|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मूर्तिकारांसमोर पावसाचे विघ्न

मूर्तिकारांसमोर पावसाचे विघ्न 

बेळगाव / प्रतिनिधी

भक्तांची संकटे दूर करणारा म्हणून विघ्नहर्ता गणेश ओळखला जातो. परंतु याच गणरायाच्या आगमनामध्ये पावसाचे विघ्न येत आहे. यामुळे मूर्तिकारांच्या मात्र नाकीनऊ येत आहे. सिलिंडर तसेच निखाऱयांची धग देऊन मूर्ती सुकविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे जादाचा खर्च करून गणेशमूर्ती सुकविण्याची वेळ मूर्तिकारांवर आली आहे.

सध्या बेळगाव जिल्हय़ात पावसाची रिपरिप सुरूच आहे. वातावरणातही थंडावा पसरला आहे. याचा परिणाम गणेशमूर्तींवर होताना दिसत आहे. मूर्ती सुकत नसल्याने मूर्तिकारांना अनेक अडचणी येत आहेत. गणेशमूर्ती तयार करताना प्लास्टर लावून फिनिशिंग करावे लागते. पॉलिश पेपरने घासून नंतरच रंग द्यावा लागतो. परंतु मूर्तीच सुकत नसल्याने त्यावर काम कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गणेशोत्सव अवघ्या 20 ते 25 दिवसांवर आला असल्याने घेतलेली कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मूर्तिकारांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. गणेशमूर्ती सुकविण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर करण्यात येत आहे. मूर्तीच्या पोकळ भागात ही शेगडी लावण्यात येत आहे. मूर्ती पूर्ण सुकल्यानंतरच शेगडी बंद करावी लागत आहे. तसेच निखारे पेटवून ते लोखंडी जाळीत घालून मूर्तीवर अडकविले जात आहेत. त्यामुळे वेळेत मूर्ती सुकणे सोपे होत आहे.

दोन मूर्तींसाठी 1 सिलिंडरची गरज

दोन मोठय़ा सार्वजनिक गणेशमूर्ती सुकण्यासाठी 1 सिलिंडरची गरज भासत आहे. तसेच 4 ते 5 किलो निखारे लागत आहेत. ही बाब मूर्तिकारांसाठी खर्चाची ठरत आहे. एका सिलिंडरची किंमत 1 हजार रुपये आहे तर 30 रुपये प्रति किलो दराने निखारे खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च मूर्तिकारांना करावा लागत आहे.

संजय मस्के (मूर्तिकार)

सार्वजनिक गणेशमूर्तींना फिनिशिंग देण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु पाऊस व थंड हवामानामुळे मूर्ती सुकण्यास विलंब होत आहे. त्यासाठी जादा खर्च करत गॅस शेगडी तसेच निखाऱयांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे मूर्तिकारांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.