|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऑनलाईन ओळखीतून झालेला संस्कृती जपणारा विवाह

ऑनलाईन ओळखीतून झालेला संस्कृती जपणारा विवाह 

मनीषा सुभेदार / बेळगाव

ती कोलकात्याची-पंजाबी कुटुंबातील, तो बेळगावचा मराठी कुंटुबातील. कोलकात्यात लग्न रात्री म्हणजेच तारों के नीचे लावले जाते. महाराष्ट्रात लग्नाचा मुहूर्त सकाळी असतो. आपल्याकडे सायंकाळच्यावेळी नववधूचा गृहप्रवेश होतो. तिकडे मुलींनी आणि महिलांनी पुरुषांच्या पाया पडण्याची पद्धत नाही. कारण ती दुर्गा किंवा लक्ष्मी देवता मानली जाते. संस्कृतीपासून संस्कारापर्यंत दोन्ही प्रांतांमध्ये लक्षणीय तफावत असूनही त्या दोघांनी लग्न केले. विशेष म्हणजे हा प्रेम विवाह नव्हता. त्याहून विशेष म्हणजे ऑनलाईन ओळखीतून हा विवाह झाला.

कोलकात्याची स्नेहा साप्रा ही पिंकी व तिलकराज साप्रा यांची कन्या. बेळगावच्या लेफ्टनंट कमोडोर मंदार कुलकर्णी यांच्याशी विवाहबद्ध होऊन बेळगावला आली. बेळगाव आणि सासरच्या वातावरणात ती इतकी सहज मिसळून गेली आहे की मंगळागौर म्हणजे काय? याचा गंधही नसताना तिने मंगळागौरीची पूजा करून रात्री जागरही केला.

ऑनलाईन विवाह सुरक्षित आहेत का? याची आज गांभीर्याने चर्चा होते. या विवाहात संभाव्य धोके किती? याबद्दल बरेच जण उपदेश करतात. मात्र स्नेहा आणि मंदार यांनी ऑनलाईन नोंदणीतून झालेल्या ओळखीवर परस्परांना पसंत केले. त्यांच्या या स्वागतार्ह अशा निर्णयावर दोघांनाही बोलते केले. तेव्हा खऱया अर्थाने ते परस्परांना अनुरुप आहेत, हे प्रकर्षाने लक्षात आले.

धनश्री व सतीश कुलकर्णी यांचा मंदार हा मुलगा. एमसीए पदवीनंतर त्याने एसएसबीमधून नाविक दलाची परीक्षा दिली आणि तो नाविक दलात रुजू झाला. अंदमान आणि चेन्नई या दोन ठिकाणी काम केल्यानंतर सध्या तो कारवारला रुजू झाला आहे. एसएसबी परीक्षेत कर्नाटकातून निवड झालेल्या चार जणांमध्ये मंदारचा सहभाग आहे. चेन्नईमध्ये आयएनएस दर्शक या बोटीवर त्याने काम केले. अंदमानला असताना त्याने कॅन्टीन सुरू करून सहकाऱयांची व कर्मचाऱयांची सोय केली. या कॅन्टीनला मंदार कुलकर्णी कॅन्टीन असेच नाव देण्यात आले आहे.

घरी जेव्हा लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा त्याने ऑनलाईनवरून अर्ज भरला. त्याने स्नेहाची माहिती पाहिली व प्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तिने ती मान्य केली आणि दोघांमध्ये नेट संवाद सुरू झाला. मंदार प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाला दिल्लीला जाताना कोलकात्यात स्नेहाला भेटला. तत्पूर्वी त्याने तिला फोन केला होता. दिल्लीहून परत येताना पुन्हा तिला भेटला. त्यानंतर चार ते पाच महिने तो तिच्याशी वेगवेगळय़ा विषयांवर चर्चा करत राहिला. 29 एप्रिलला त्याने आपल्या घरी स्नेहाशी विवाह करण्याचा विचार बोलून दाखविला. पालकांनी त्याच्या पसंतीला संमती दिली.

नाविक दिनादिवशीच कोलकात्यामध्ये विवाह

स्नेहाच्या घरी या विवाहाबद्दल पालकांना काळजी होती. तिने 8 मे रोजी आपल्या पालकांना सांगितले तेव्हा पूर्णतः वेगळय़ा संस्कृतीमुळे काळजीपोटी पालकांनी तिला पुनर्विचार करण्यास सांगितले. परंतु मंदार जेव्हा तिच्या पालकांना भेटला तेव्हा मात्र नकार होकारामध्ये बदलला. स्नेहा आई-वडिलांसह बेळगावला आली आणि 4 डिसेंबर 2017 रोजी नाविक दिनादिवशीच कोलकात्यामध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. कुलकर्णी परिवार कोलकात्याला जाऊन वधूला घेऊन परत आले.

तिकडच्या विवाह पद्धतीबद्दल बोलताना स्नेहा म्हणाली, तारों के छाँव मे तेथे लग्न होते, दुल्हा घोडय़ावर बसून वाजत-गाजतच यावा लागतो. सूर्योदयापूर्वी डोलीमधून दुल्हनला बिदा केले जाते. तेथे वधूला पैशांची माळ घालण्याची पद्धत आहे. ती कोणालाही नमस्कार करत नाही. कारण तेथे स्त्राr हे देवतेचे रुप मानले गेले आहे. आज मात्र स्नेहा सासरी सर्वांना वाकून नमस्कार करते. सेहरामध्ये म्हणजेच घुंगटमध्ये वधू असते. वधूच्या बहिणीला मुलाच्या कुटुंबाकडून अंगठी देण्याची पद्धत आहे. बाकी जे मानपान आहेत त्याचे अवडंबर केले जात नाही. सासरच्या मंडळींना जे काही द्यायचे आहे, ते फक्त सुनेलाच द्यायचे असते. लग्नाच्या आदल्यादिवशी मुलीच्या भावाला इच्छेनुसार पैसे देण्याची पद्धत आहे.

मंगळागौर तर खूपच आवडली!

लग्नानंतर स्नेहा बेळगावला आली. घरी तिने कधीच स्वयंपाक केला नाही. परंतु आता तिला महाराष्ट्रीयन स्वयंपाक उत्तम पद्धतीने येतो. आमच्याकडे इडली-डोसा जेवणावेळी खातात. पोहे, उप्पीट क्वचितच केले जाते. पण आता मला हे पदार्थ आवडतात. ठेचा आणि साबुदाणा खिचडी यांच्या मी प्रेमात पडले, असे ती सांगते. येथे केले जाणारे सर्व सण आणि परंपरा मला आवडतात. मंगळागौर तर खूपच आवडली. सासूबरोबर खेळ खेळायचा ही कल्पनाच मला रोमांचित करून गेली, असे ती म्हणते.

मंदारचा कोणता गुण आवडतो? या प्रश्नावर ते कमी बोलतात. मी खूप जास्त बोलते. एखादी गोष्ट जमली नाही तर त्यावर खिल्ली न उडविता मंदार आणि सासू, सासरे खूप छान तऱहेने समजावितात. वास्तविक ऑनलाईनवर माझी माहिती बघून 1 हजार जणांनी रिक्वेस्ट पाठविली होती. परंतु माझे भाग्य हे मी मंदारची निवड केली. कोलकात्याची आठवण नेहमी येते. परंतु मंदार आणि कुटुंबामध्ये मी खूप आनंदी आहे, असे ती प्रांजळपणे सांगते.

मंदारच्या मते स्नेहा खूप मनमोकळी आहे. साखरपुडा झाला त्या दिवसापासून तिने माझ्या आई-वडिलांना दररोज न चुकता फोन करून त्यांची चौकशी केली आहे. मला वाटले नव्हते, त्यापेक्षाही लवकर ती आमच्या घरी सहज मिसळून गेली आहे. ऑनलाईन नोंदणी विवाहामध्ये धोका असू शकतो. परंतु आपण खात्री करून पूर्ण विचारांती निर्णय घेतल्यास हा विवाह यशस्वी होऊ शकतो, असे तो म्हणतो.

विवाहाचा संपूर्ण खर्च तिने स्वतः केला

विवाहापूर्वी स्नेहा दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत शिकवणी घ्यायची. कौतुकाची बाब ही की आपल्या विवाहाचा संपूर्ण खर्च तिने स्वतः केला आहे, असे तिचे सासू-सासरे आवर्जून सांगतात. स्नेहा धार्मिक वृत्तीची आहे. त्यामुळे दर गुरुवारी विष्णुपुराण वाचल्यानंतरच ती आहार घेते.

वैशिष्टय़पूर्ण चुडा

स्नेहाच्या हातात बंगाली पद्धतीचा चुडा आहे. 50 ते 100 पर्यंत बांगडय़ा त्यामध्ये असतात. त्या आम्ही मोजत नाही. तसे केल्यास पतीचे आयुष्य कमी होते, अशी तेथे धारणा आहे. वर्षभर हा चुडा ठेवावा लागतो. सासूने परवानगी दिल्यावर तो उतरविता येतो आणि नदीला किंवा धार्मिक स्थळी जाऊन तो अर्पण करावा लागतो.

इतर संस्कृती जाणून घेणे आवश्यक : मंदार

जग जवळ आलं आहे, असे म्हणताना इतर संस्कृती जाणून घेणे आवश्यक वाटते. तसा प्रयत्न सर्वांनीच करावा. पण आपण प्रथम कृती करू, असे मला वाटले. म्हणून मी दुसऱया संस्कृतीतील मुलीशी लग्न करायचे ठरविले.

Related posts: