|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती जप्त करा

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती जप्त करा 

जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांचा अधिकाऱयांना आदेश, आजपासून कारवाईस प्रारंभ

प्रतिनिधी / बेळगाव

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत यापूर्वीही बैठक घेऊन मूर्तीकारांना सूचना करण्यात आली आहे. तरी देखील काही जणांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पुन्हा तयार केल्या आहेत. त्यामुळे त्या मूर्ती जप्त कराव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी झियाउल्ला एस आणि पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी अधिकाऱयांना दिले आहेत. यामुळे गणेशमूर्तीकार आणि गणेशभक्तांना हा वेठीस धरण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण अधिकारी, महापालिका व नगरपालिका अधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी हा आदेश देण्यात आला. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे विहिरी, नदी, नाले व जलाशये प्रदूषित होत आहेत. मागील वषी याबाबत जनजागृती करण्यात आली होती. यावषीही मूर्तीकारांची बैठक घेऊन याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तरी देखील बाहेरील राज्यातून बेळगावमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आयात करण्यात येत आहेत. तसेच काही मूर्तीकार अशा मूर्ती बनवत आहेत. तेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देवून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतील तर त्या जप्त कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. 

बेळगावातील सर्वच मूर्तीकारांनी आता गणेशमूर्तींचे काम पूर्ण केले आहे. जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असताना आता पुन्हा जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी मूर्तीकारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी तर मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी शंकर मारिहाळ यांना तातडीने पथक नियुक्त करुन शहरातील मूर्ती तयार करण्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी व जर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतील तर त्या तातडीने जप्त कराव्यात, असा आदेश दिला आहे.

मोठा गोंधळ उडण्याची शक्मयता

मंगळवारपासूनच या कारवाईला प्रारंभ होणार आहे. मूर्तीकारांनी सर्व मूर्ती तयार केल्या आहेत. घरगुती मूर्तींबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीकारांचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी हा आदेश दिल्यामुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. गणेशमूर्ती जप्त केल्या तर गणेशोत्सव करायचा कसा? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

केवळ बेळगावातच नव्हे तर संपूर्ण जिल्हय़ातील नगरपालिका, नगरपंचायत या भागातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीही जप्त करण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्रातून गणेशमूर्ती मोठय़ा प्रमाणात येतात. त्यासाठी त्या ठिकाणीही चेकपोस्टची उभारणी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी तातडीने कोगनोळीजवळ चेक पोस्टची उभारणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. एकूणच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्यासाठी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुन्हा गोंधळ उडण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.

या बैठकीला पोलीस उपायुक्त महानिंग नंदगावी, महापालिकेचे आरोग्याधिकारी शशिधर नाडगौडा, प्रवीण बागेवाडी तसेच विविध नगरपालिका आणि नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.