|Thursday, June 27, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पालकत्वाचा अतिरेक नकोच!

पालकत्वाचा अतिरेक नकोच! 

विवाह संस्थेला अनेक समस्यांनी घेरले आहे. घटस्फोटांचे वाढते प्रमाण आपण सारेच पाहतो आहोत. जोडप्यातील टोकाला जाणाऱया मतभेदांची, घटस्फोटांची विविध कारणे आहेतच. परंतु पालकांच्या हस्तक्षेपामुळे मुला-मुलींच्या संसारात उद्भवणाऱया समस्या, त्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. अर्थात आपला मुलगा वा मुलगी कुठे चुकत असेल तर त्यांना समज देऊन योग्य दिशा देणारे पालकही आहेत. परंतु आई-वडिलांचा मुला-मुलींच्या संसारातील हस्तक्षेप, विशेषतः आईचे सततचे सल्ले आणि पित्याचा अवाजवी पाठिंबा यामुळे उद्भवणाऱया समस्या आणि घटस्फोटाच्या दिशेने होणारी वाटचाल अशा अनेक केसेस समोर येऊ लागल्या आहेत.

कौशिक आणि वीणा हे असंच एक उच्चशिक्षित जोडपं. वीणा तिच्या आई-वडिलांची एकुलती एक अत्यंत लाडात वाढलेली मुलगी. वीणाची सकाळ व्हायची ती घरच्यांच्या फोननेच. ‘वीणा, बाळा उठली का गं? काही त्रास वगैरे नाही ना? (सासर म्हणजे त्रास असणार हे विनाकारण गृहित धरूनच…) नाही. आताच उठले गं… तुझी खूप आठवण येते. हो गं बाळा, तू ये इकडे चार दिवस. हो येणारच आहे. बरं वीणा कॉफी घेतलीस का? चहाची सवय नाही ना तुला… हो ना, तोच प्रॉब्लेम गं, इथे कुणी कॉफी घेतच नाही. तिकडे तू करून द्यायचीस.. इकडे कुणाजवळ मागू. मला किचनमध्ये जायचाच कंटाळा येतो. मिस यु मम्मा… हो गं… नवऱयाला सांग आणि ‘मेड…..’ ठेव ना. पण त्रास नको करून घेऊ तोपर्यंत. वरतीच एक शेगडी घे, तिथेच स्वतःपुरती कॉफी करायची गं. उगीच आबाळ नको… हो मम्मी. ये चार दिवस… हो, उद्याच येते.

झालं… दर चार दिवसांनी माहेरची आठवण येते म्हणून जाण्याचा हट्ट आणि सततच्या सल्ल्यांनी सासरचं वातावरण बिघडू लागतं. अत्यंत सुसंस्कृत आणि मोकळं वातावरण असूनही वीणाची आणि तिच्या आईची ‘सासर-माहेरची’ तुलना, यामुळे ती ‘त्या’ घरात रुळलीच नाही. वादविवाद, हट्ट, आणि पटत नसेल तर घटस्फोट द्या. अशा लोकांच्या भूमिकेमुळे कौशिकच्या घरची माणसे जेरीस आली. ही केस समोर येते न येते तोच संध्याकाळी ‘निशा’ आणि कुटुंबीय भेटायला आले. ‘निहार’… निशाचा नवरा, उच्चपदस्थ मुलगा. परंतु अगदी बालपणापासून ‘आई म्हणेल तेच प्रमाण’, तोच अंतिम शब्द अशी त्याची वाटचाल होती. प्रत्येक बारीक-सारिक गोष्ट आईला विचारून करणारा हा मुलगा स्वतःच्या संसारात साधे निर्णयही घेऊ शकत नव्हता. हळूहळू सारं ठीक होईल या आशेवर असणाऱया निशाला वर्षभराने प्रेग्नन्सी राहिली आणि खूप शारीरिक त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी बेडरेस्ट सुचविली. ती मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी नाटक करत असेल, आमच्यावेळी नाही झाले असले त्रास, लक्ष देऊ नको असं निहारला वारंवार सांगितलं जाऊ लागलं. सवयीनुसार तेच योग्य असणार यावर ठाम रहात इतका त्रास असेल तर माहेरच्यांनी येऊन घेऊन जावे असा आग्रह माय-लेकांनी धरला. ती अखेर माहेरी गेलीही परंतु एक महिन्यात चौकशीसाठी एक फोनही नाही, फोन केला तर तोही घेत नाही म्हणून हे सारं कुटुंब रडकुंडीला आलं. निहारजवळ  बोलल्यावर प्रत्येक शब्दानंतर आई असं म्हणाली, आई तसं म्हणाली, आई उगीचंच नाही ना सांगणार, ती म्हणते म्हणजे योग्यच असणार, हेच वारंवार येत होते. त्याची भूमिका अगदी ‘सांग काम्या’ अशीच काहीशी होती. त्याचं व्यक्तिमत्त्व, विचार, भावना याचं स्वतंत्र अस्तित्व त्याला स्वतःलाच जाणवत नव्हतं. आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपले निर्णय आपण आपल्या वैचारिक आणि भावनिक बैठकीवर ठामपणे उभे राहून घेऊ शकतो हे त्याला कळलेलंच नव्हतं.

एकंदरच ‘ममाज् गर्ल वा ममाज् बॉय’ दोन्हीचा अतिरेक त्रासदायकच ठरतो. पहिल्या केससंदर्भात बोलायचं झालं तर मुलीचा विवाह हे एक मोठ्ठे स्थित्यंतर असते. आपली लाडात वाढवलेली मुलगी सासरी जाणार, तिच्या जीवनात येणारी नवीन जबाबदारी, नाती हे सारं निभावताना तिची होणारी धावपळ याविषयी मनामध्ये काळजी असणे स्वाभाविक आहे परंतु तिला मिळालेले वातावरण सर्वस्वी प्रतिकूलच असेल, तिला तिथे त्रासच होणार हे गृहित धरणेही तितकेच चुकीचे! आपल्या आयुष्याची वाटचाल करताना आपल्याला आलेले काही बरे-वाईट अनुभव हे स्वतःच्या मर्यादित चौकटीपुरते जरी खरे असले तरी ते जीवनाचे सार्वत्रिक वा सार्वजनिक सत्य होऊ शकत नाही. उपवर वधू वा वर यांच्या विवाहविषयक चर्चा ज्यावेळी सुरू होते त्यावेळी जबाबदाऱया, हक्काप्रमाणेच कर्तव्यांची जाणीव, समायोजन, परस्परांना समजून घेण्यासाठी आवश्यक तो वेळ देणे याबाबत खरंतर अनुभवाचे अनेक टप्पे पार केलेल्या पालकांनी योग्य मार्गदर्शन करायला हवे. ‘मुलगी असो वा मुलगा’ प्रत्येक गोष्टीकडे मी म्हणेन तेच व्हायला हवे वा आमचा शब्द म्हणजे अंतिम शब्द या पालकांच्या अट्टहासाने ती मुले सुरुवातीला जरी ‘आज्ञाधारक’ वाटत असली तरी नंतर हीच गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात अडथळा बनू शकते याचे भान ठेवणेही आवश्यक आहे. मुलीच्या संसाराच्या बाबतीत पालकांचा सततचा हस्तक्षेप जसा समस्या निर्माण करू शकतो तसंच मुलाच्या संसारातही अती दखल दिल्याने समस्या निर्माण होतात. मुलाची आई, सासूच्या भूमिकेत शिरताना थोडी पझेसिव्ह होऊ शकते-इतकी वर्षे वाढविलेला आपला ‘लाडला’ सुनेच्या हाती सोपवताना तिला काळजी वाटू शकते, परंतु केवळ मीच म्हणेन तसंच त्याने वागले पाहिजे, घरातील कोणतीच गोष्ट परवानगीशिवाय बदलता कामा नये, प्रत्येक बारीक-सारिक निर्णयात, आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप, विनाकारण सल्ले देत राहणे हेही त्रासदायकच! आई-मुलीच्या नात्याच्या अट्टहासापेक्षा ‘सासू-सुना’ मैत्रिणी कशा होतील यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. अहंकाराची लढाई लढण्यापेक्षा, ‘नकारापेक्षा होकार आणि झिडकारण्याऐवजी समंजस स्वीकार’ हे तंत्र अवलंबल्यास हे नाते सुंदर होईल. मुळातच पती-पत्नी हे नाते जोडलेले नाते आहे. स्वतःच्या मुलाशी वा मुलीशी पालकांचे जैविक नाते असते, रक्ताचे नाते असते, परंतु दुसऱयाच्या घरातून येणारी  मुलगी म्हणजे सून किंवा ज्या घरात आपली मुलगी जाते तो मुलगा म्हणजेच ‘जावई’ व त्या-त्या घरातील सदस्य ही सारी एक प्रकारची ‘सांस्कृतिक नाती’ आहेत. ‘विवाह संस्था आणि त्या माध्यमातून निर्माण होणारी कुटुंब संस्था हा आपल्या पूर्वजांनी अत्यंत हुशारीने आखलेला आणि दीर्घकाळ टिकलेला एक सामाजिक करार आहे. त्यामुळे एकमेकांना समजून घेत वाटचाल करणे गरजेचे आहे. ‘आपल्या मुलीला मदत करणारा, तिचं ऐकणारा ‘जावई’ सद्गुणी परंतु सुनेचे ऐकून वागणारा मुलगा दुर्गुणी’ असे चष्मे घालून पहाणंही कुठेतरी थांबायला हवं. मुलाचा वा मुलीचा संसार सुखी होण्यासाठी, त्यामध्ये अकारण हस्तेक्षप करण्यापेक्षा या जोडलेला नात्यांना सामंजस्याचे बळ देण्याचा संकल्प करूया… असेच म्हणावेसे वाटते.

(टीप.. लेखातील नावे काल्पनिक आहेत)

Ad.  सुमेधा देसाई,