|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दोन बातम्या

दोन बातम्या 

एकाच दिवशी अनेक वर्तमानपत्रात पहिल्या पानावर वेगवेगळय़ा क्षेत्रातल्या दोन बातम्या वाचनात आल्या.

पहिली बातमी एका अतिशय मोठय़ा सहकारी बँकेबद्दल होती. बँकेवर सायबर हल्ला झाला आणि कोटय़वधी रुपये चोरीला गेले अशा आशयाची. बातमीच्या मथळय़ात बँकेचे नाव ठळक अक्षरात छापलेले होते. बातमी अगदी रंगवून रंगवून दिली होती. दोन दिवस बँकेचे व्यवहार कसे ठप्प झाले वगैरे. अर्थात टीव्हीच्या वृत्तवाहिन्या देखील यात मागे नव्हत्या. त्यांना तर टीआरपीसाठी काहीतरी निमित्त हवेच असते. या सगळय़ा बातम्या सतत आदळल्यावर बँकेचे ठेवीदार, खातेदार भ्याले नसते तर नवलच. सगळेजण बँकेकडे धाव घेऊन पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करणार.

अर्थशास्त्राची मूलभूत जाण असलेले लोक सांगू शकतील की ठेवीदारांमध्ये घबराट पसरली तर प्रसंगी चांगली बँकदेखील अडचणीत येऊ शकते. ते असो.

आता दुसरी बातमी सांगतो. बँकेबद्दल आलेल्या बातमीपेक्षा अगदी किंचित लहान आकारात ही बातमी छापली होती. बातमी एका पंचतारांकित हॉटेलबाबत होती. सदरहू हॉटेलमध्ये अनैतिक व्यवहार चालतात हे समजल्यावर पोलिसांनी तेथे धाड घातली आणि एका विदेशी तरुणीसह काही जणांना रंगे हाथ अटक केली. या बातमीत मात्र हॉटेलचे नाव गोपनीय ठेवले होते.

मनात विचार आला, प्रसिद्धी माध्यमे गोपनीयतेचे जे संरक्षण अनैतिक व्यवसाय करताना रंगे हाथ पकडलेल्या हॉटेलला देतात तेच संरक्षण विदेशी हॅकर्सच्या हल्ल्यात बळी पडलेल्या बँकेला द्यायला काय हरकत आहे? समजा या बातमीत बँकेचे नाव छापले नसते तर सर्व ठेवीदारांपर्यंत बातमी पोचली नसती. घबराट पसरली नसती.  

आपल्या देशातला सर्वसामान्य नागरिक अद्याप पुरेसा संगणक साक्षर झालेला नाही. बँकेत जाऊन विड्रॉल स्लिपवर सही करून पैसे काढणे त्याला सोपे वाटते. एटीएम कार्ड वापरायला तो घाबरतो. मग पुढचे डिजिटल व्यवहार तर लांबची गोष्ट झाली. विदेशी हॅकर्स बँकेवर हल्ला करू शकतात ही सनसनाटी बातमी पुनः पुन्हा दिसली तर तो डिजिटल व्यवहार करायला अजून जास्त भिऊ लागेल. बँक खात्याला आधार कार्ड जोडायला का कू करील. 

आणि अनैतिक व्यवहार जिथे होत होते त्या हॉटेलचे नाव गोपनीय ठेवून माध्यमांनी नेमके काय मिळवले?

एक सामान्य ज्ये÷ नागरिक म्हणून मी अतिशय गोंधळलो आहे.