|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनला मोठा झटका

चीनला मोठा झटका 

ओबोर प्रकल्पातून मलेशियाची माघार

वृत्तसंस्था/ बीजिंग 

 चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट-रोड’ (ओबोर) प्रकल्पाला मोठा झटका बसला आहे. मलेशियाने या प्रकल्पामधून माघार घेतली आहे. मलेशियाच्या पंतप्रधानांनी चीन दौऱयाच्या अखेरच्या दिवशी याची माहिती दिली. भारतासह जगाच्या अनेक देशांना चीनच्या या प्रकल्पाबद्दल आक्षेप आहे. गिलगिट-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या वादग्रस्त क्षेत्रातून जाणाऱया चीनच्या या प्रकल्पाला भारत स्वतःच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन मानतो.

चीन या प्रकल्पासाठी मोठी रक्कम गुंतविणार असल्याने त्याचा वापर ‘कर्जाचा सापळा’ म्हणून  होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होतेय. मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी देखील कर्जाचाच दाखला देत प्रकल्पातून माघार घेतल्याची माहिती दिली.

प्रकल्पाची गरज नाही

या प्रकल्पात 20 अब्ज डॉलर्सचा पूर्व किनारी रेल्वे प्रकल्प आणि 2.3 अब्ज डॉलर्सचे दोन ऊर्जाविषयक पाईपलाईन प्रकल्प साकारले जाणार होते, हे प्रकल्प सध्या प्रलंबितच आहेत. या प्रकल्पांमध्ये अत्याधिक प्रमाणात गुंतवणूक होणार होती आणि आमच्यात इतके सामर्थ्य नाही. आम्ही ही रक्कम फेडू शकत नाही आणि सध्या मलेशियात या प्रकल्पांची गरज देखील नाही. सद्यस्थितीत राष्ट्रीय कर्ज कमी करण्यावर मलेशियाने लक्ष केंद्रीत केल्याचे महातिर म्हणाले.

दिवाळखोर होण्याचा धोका

मागील नजीब रजाक सरकारवर मूर्खतेचा आरोप करत महातिर यांनी कर्जाबद्दल आम्ही सजग न राहिल्यास दिवाळखोर होऊ शकतो असे म्हटले. या प्रकल्पांमधून बाहेर पडण्यासाठी दंड म्हणून रक्कम द्यावी लागतील. या प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या रकमेचे नेमके काय झाले हे देखील जाणून घ्यावे लागेल, असे महातिर म्हणाले.