|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » 6 बोटे त्या भारतीय हेप्टॅथलिटची चिंता!

6 बोटे त्या भारतीय हेप्टॅथलिटची चिंता! 

भारतीय हेप्टॅथलिट स्वप्ना बर्मन ही पुढील आठवडय़ापासून सुरु होणाऱया ऍथलेटिक्स इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी तिची चिंता वेगळीच असून अद्यापही तिला तिच्या मापाचे शूज मिळत नाहीत आणि याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांपेक्षा लांब असलेले तिचे तळपाय आणि दोन्ही पायाची तिला असलेली 6 बोटे!

चार वर्षांपूर्वी टिनेजर असताना तिने इंचेऑनमध्ये आशियाई पदार्पण केले. आश्चर्य म्हणजे त्यावेळी देखील तिची चिंता हीच होती. पतियाळातील प्रशिक्षण शिबिरातून ती वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली, ‘स्पर्धेत उंच उडीच्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यापूर्वी मला माझ्या मापाचे योग्य शूज मिळत नाहीत. मी आतापर्यंत भारतातील एका मॉडेलचे शूज वापरत होते. पण, दुर्देवाने ते आता भारतात उपलब्ध होत नाहीत. आताही माझ्याकडे त्याच मॉडेलचे जुने शूज आहेत आणि अगदीच वेळ पडली, नवे शूज उपलब्ध झाले नाहीत तर मला तेच जुने शूज घालून जकार्तामध्ये प्रत्यक्ष स्पर्धेत उतरावे लागणार आहे’.

केवळ क्रिकेटचेच सर्वाधिक वेड असलेल्या भारतात ऍथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवणे मुळाच आव्हानात्मक आहे. येथे ऍथलेटिक्सला प्रामुख्याने सरकारी सहाय, अनुदान यांच्यावर अवलंबून रहावे लागते. अन्य प्रायोजक मिळत नाहीत आणि त्यातच सर्वसामान्यांपेक्षा वेगळे शूज हवे असतील तर आणखी अडचणीत भर पडते. पूर्व भारतात जलपईगुरी या छोटय़ाशा खेडय़ातून पुढे आलेल्या स्वप्ना बर्मनसाठी तर यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

स्वप्नाने तसे भारतातील काही ब्रँडचे शूज वापरुन पाहिले. पण, त्यांचा दर्जा टिकणारा नव्हता. अनेक ब्रँड आजमावून पाहिल्यानंतर योग्य साईजचे शूज मिळवण्यासाठी एका मॉडेलची मदत तिला लाभली. अर्थात, लांब तळपायामुळे उडी घेतल्यानंतर पुन्हा जमिनीवर लँडिंग करणे तिच्यासाठी बरेच वेदनादायी ठरत आले असून याच कारणामुळे तिचे शूज अधिक टिकत नाहीत, ही देखील तिची मुख्य चिंता आहे. आता तिने या कारणाच्या मुळाशी जाऊन, त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिला सहावे बोट शस्त्रक्रियेने काढून टाकण्याचा विचित्र सल्लाही दिला गेला. पण, अर्थातच तिला ही सूचना अजिबात मान्य नाही.

काय म्हणतात तिचे प्रशिक्षक?

सुभाष सरकार हे तिचे प्रशिक्षक देखील स्वप्ना बर्मनच्या या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी बरेच धडपडले आहेत आणि त्यांच्या पदरीही प्रामुख्याने निराशाच आली आहे. ‘आम्ही बराच प्रयत्न केला. पण, 6 बोटे व्यवस्थित बसतील, असे कोणतेच शूज उपलब्ध नाहीत आणि ते तयार करवून घेतले जातात, त्यावेळी त्याच्या दर्जाची खात्री देता येत नाही. 6 बोटांचे शूज कसे असावेत, यावर अधिक संशोधनच झाले नसल्याने कंपन्यासुद्धा हतबल आहेत. पॅरा ऍथलिट्ससाठी स्वतंत्र शूज तयार करवून घेतले जातात. अशा कंपन्यांशी देखील आम्ही संपर्क साधला. पण, तो प्रयत्नही सफल ठरलाच नाही’, असे सुभाष सरकार याप्रसंगी म्हणाले.

स्वप्ना बर्मनला यापूर्वी जवळपास वर्षभरासाठी गुडघ्याच्या व पायाच्या दुखापतीमुळे बाहेर रहावे लागले होते. त्यानंतर जूनमध्ये तिने आशियाई स्पर्धेच्या सहभागासाठी सरावाला सुरुवात केली. प्रारंभी तिचा सराव अनियमित होता. पण, प्रत्यक्ष स्पर्धेत तिच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे तिचे प्रशिक्षक म्हणतात. स्वप्नाकडे जबरदस्त इच्छाशक्ती आहे आणि तिने आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या (5942) पलीकडे झेप घेतली तर तिला निश्चितच पदक मिळेल, असा आशावादही ते व्यक्त करतात.

4 वर्षांपूर्वी महिलांच्या हेप्टॅथलॉनचे सुवर्ण उझ्बेकच्या एकतेरिना व्होरोनिनाने 5912 गुणांसह जिंकले होते. त्यावेळी बर्मनला मात्र 5178 गुणांवर समाधान मानावे लागले होते. स्वप्ना उडी घेणे, थ्रो आणि अडथळय़ांच्या शर्यतीत उत्तम आहे. पण, धावण्यात ती मजबूत नाही, याच आघाडीवर आम्ही सध्या परिश्रम घेत आहोत’, असे सरकार यांनी शेवटी नमूद केले.