|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला अंनिसचे निर्भय मॉर्निंग वॉक

गडहिंग्लजला अंनिसचे निर्भय मॉर्निंग वॉक 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

येथील अंधश्रद्धा निर्मुलन समिती व पुरोगामी संघटनांच्या वतीने ‘जबाब दो आंदोलन’ करत सोमवारी सकाळी निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले.

अंनिसचे संस्थापक व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला 20 ऑगस्ट रोजी 5 वर्षे पूर्ण झाली. डॉ. दाभोळकरांच्या खूनानंतर अंनिसच्या वतीने राज्यभरातील कार्यकर्त्यांनी संयम आणि विवेकाने निषेध नोंदविला. डॉ. दाभोळकर यांच्या खूनाच्या तपासाचा आग्रह धरत गेल्या पाच वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लावणारी एकही कृती न करता संविधानाच्या चौकटीत निषेध कसा नेंदवावा याचा आदर्श घालून दिला. नुकतेच डॉ. दाभोळकर यांच्या मारेकऱयांना अटक करून न्यायालयात हजर केले असले तरी डॉक्टरांचे इतर मारेकरी व त्यांचे सूत्रधार यांच्यापर्यंत पोहचण्यात अजूनही तपास यंत्रणेला व शासनाला यश आले नाही. त्याचबरोबर ज्येष्ठ विचारवंत व कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी अंनिस तर्फे 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणि ‘जबाब दो आंदोलन’ करण्यात येत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अंनिस व पुरोगामी संघटनांच्या वतीने निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. कडगाव रोड, वीरशैव बँक, बाजारपेठ, नेहरू चौक ते दसरा चौक अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत चळवळीची गाणी म्हणण्यात आली. ‘डॉ. दाभोळकर अमर रहे, कॉ. पानसरे अमर रहे, डॉ. कलबुर्गी अमर रहे, गौरी लंकेश अमर रहे’, ‘डॉ. दाभोळकर हम शरमिंदे है, आपके कातील जिंदा है’ अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीचा समारोप दसरा चौकात करण्यात आला. यावेळी प्रा. किसनराव कुराडे, प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. आशपाक मकानदार, मंजुषा कदम, अरुणा शिंदे, बाळासाहेब मुल्ला यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, उदयराव जोशी, प्रा. जे. वाय. बारदेस्कर, प्रा. ज्ञानराजा चिघळीकर, प्रा. शिवाजीराव होडगे, प्रा. सदानंद वाली, प्राचार्य गंगाराम शिंदे, अशोकराव मोहिते-गिजवणेकर, उज्ज्वला दळवी, सुवर्णलता गोविलकर, सुमन सावंत, स्नेहा भुकेले, मंजुषा कदम, छाया इंगळे, स्वाती चौगुले, अनघा तौकरी, गीता पाटील, जिया मुल्ला, शोभा जिनगी, प्रा. आशपाक मकानदार, प्रा. सुभाष कोरी, गणपतराव पाटोळे, शहाजी गोंगाणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे यांनी नियोजन केले होते.