|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पुष्पवैभव बहरले

पुष्पवैभव बहरले 

श्रावणसरींनी सर्वत्र हिरवळ पसरली आहे. या हिरवळीची शोभा वाढविणारी रंगीबेरंगी फुले मनाला मोहून टाकत आहेत. ही फुले म्हणजे हिरव्यागार धरतीने केलेला शृंगारच जणु. हा हिरवळीचा शृंगार श्रावणात भक्तांच्या माध्यमातून भगवंताच्या माथी शोभून दिसतो. व्रत वैकल्याचा मानला जाणारा श्रावण महिना आणि सणाच्या निमित्ताने केली जाणारी भगवंताची पूजा यामुळे बेळगावातील फुल बाजार सुगंधित बनला आहे.

पांढरी शेवंती… पिवळा धमक व भडक केशरी झेंडू… आबोली रंगाची आबोली…  नाजूक जुई… सदाबहार मारी गोल्ड, जांभळय़ा निळय़ा रंगाचा अष्टर अशा अनेक प्रकारच्या फुलांनी श्रावणमासाची शोभा वाढविली आहे. शंभु महादेवाचा सोमवार, मंगळागौरीचा मंगळवार, महालक्ष्मीचा शुक्रवार आणि फुलांची विशेषता यामुळे त्या त्या दिवशी विविध रंगांच्या फुलांचा मान असतो. फुलांचा खपदेखील भक्तांच्या श्रद्धेवरच अवलंबून आहे. यामुळे श्रावणानिमित्त देवाच्या चरणापासून मुकुटापर्यत फुलांची आकर्षक रचना करुन श्रावण मासाच्या पूजेचे महत्व अधोरेखित होताना दिसत आहे.

न्यू गांधीनगर येथील फुल मार्केटमध्ये सकाळी 5 ते 9 फुल मार्केट अगदी तेजीत असते. शेतातून शेतकऱयाकडे, शेतकऱयांकडून व्यापाऱयांपर्यंत, व्यापाऱयांकडून किरकोळ विपेत्यापर्यंत आणि विपेत्यांकडून भक्तांपर्यंत असा नाजूक फुलांचा प्रवास वेगाने सुरु असतो. नाजूक फुले देवाच्या चरणापर्यंत जाईपर्यंत टवटवीत आणि प्रसन्न रहावीत याची दक्षता घेतली जाते. श्रावणामध्ये फुलांची मागणी वाढली असून मार्केटला बहर आल्याचे दिसत आहे. आवक, मागणी आणि दर यांचा समतोल साधत फुलबाजार दररोजच सुगंध देतो आहे.

आवक अधिक… दर कमी…

श्रावण महिन्यात दरवषी फुलांचा दर अधिक असतो. यावेळी पावसाने चांगली हजेरी लावली असल्याने आवक वाढली आहे, त्या तुलनेत फुलांचे दर कमी आहेत. श्रावण महिन्यापासून फुल बाजाराला बहर येतो, त्यानंतर चतुर्मासापर्यंत ही मागणी  कायम राहते. मात्र त्या तुलनेत फुलांच्या आवकेप्रमाणे दर कमी अधिक होत असतात. सध्या न्यू गांधीनगर येथील फुल बाजारात गलाटा

10 ते 20 रु. किलो, अष्टर 80 ते 100 रु. किलो, गुलाब 30 रु. एक गुच्छ (20 फुले), पांढरी शेवंती 60 ते 100 रु किलो, बटण गुलाब 120 रु. किलो, लिली एक बंडल 10 रु., निशिगंध 200 रु किलो, झेंडू (पिवळा) 30 रु किलो, झेंडू (केशरी) 20 रु किलो, मारी गोल्ड 80 ते 100 किलो, जर्बेरा 10 फुले 60 रु, गजरा 80 ते 100 रु. बंडल असा दर आहे. सध्या श्रावणमासात पांढऱया शेवंतीला अधिक मागणी आहे. बाराही महिने मिळणाऱया गलाटा फुलांना अधिक मागणी असून दर कमी झाला आहे.

फुल मार्केटमध्ये रात्री उशिरा फुलांची आवक होते. प्रामुख्याने यरगट्टी, बेंगळूर, घटप्रभा, राणेबेन्नूर, गदग, चिकबळ्ळापूर, विजापूर, दावणगेरी, हुबळी तसेच बेळगाव जिल्हयातील विविध खेडय़ांतून फुलांची आवक होते. श्रावणात प्रामुख्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दर वाढतो. मात्र यावर्षी ऐन श्रावणात फुलांचे दर कमी झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

फुलांतून साकारतात कलाकृती…

श्रावणाच्या निमित्ताने मंदिरामधून शिवलिंगाची पूजा तसेच घराघरातून महालक्ष्मीची पूजा केली जाते. रंगीबेरंगी फुलांची आरास करुन फुलांमधून विविध प्रतिमा साकारल्या जात आहेत. यामुळे फुलाचा आविष्कार श्रावणात व्रत वैकल्यांच्या माध्यमातून दिसून येतो. श्रावणात घरोघरी प्रथेप्रमाणे सत्यनारायण पूजा केली जाते. यामुळे या पूजेच्या निमित्ताने सत्यनारायणावर वाहण्यासाठी फुले वापरली जातात. फुलांचा वापर करुन आकर्षक कलाकृतीदेखील साकारल्या जातात.  विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छांची रचना, देवीच्या किरीटापासून ते पैंजणापर्यंतच्या दागिन्यांमधून फुलांचा अविष्कार अनुभवायला मिळतो आहे. घराच्या दारातील रांगोळीपासून देवघरातील देव्हाऱयापर्यंत फुले पहायला मिळतात. अर्थात श्रावण महिना असल्याने विविध धामिक कार्यक्रम, पूजेच्या माध्यमातून सर्वच प्रकारच्या फुलांची मागणी वाढते.

विविध ठिकाणी फुलांची विक्री…

गणपत गल्ली, समादेवी गल्ली, शहापूर, वडगाव तसेच जुने बेळगाव या बाजाराच्या ठिकाणी महिला फुलांची विक्री करताना दिसतात. बाजारातून जाताना देवाच्या पूजेसाठी म्हणून फुले घेतली जातात. गुंफ्यावर विकली जाणारी फुले नागरिकांसाठी सोयीची ठरतात. यामुळे श्रावणात बाजारातील या फुल विपेत्यांकडून मोठय़ा प्रमाणात फुलांची विक्री केली जाते. याबरोबरच गल्लोगल्ली फिरते विपेते ‘फुले घ्या फुले’ अशी हाक देत फिरताना दिसतात. सकाळी पूजेच्यावेळी घराच्या जवळच मिळणारी फुले तसेच हारदेखील नित्यपणे घेतली जातात.  यामुळे श्रावण मास हा फुलांच्या माध्यामातून उत्साह, सुंगध आणि श्रद्धा यांची शिकवण देतो.

राधिका सांबरेकर