|Monday, July 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोवा आणि अटलजींचे अतूट ऋणानुबंध

गोवा आणि अटलजींचे अतूट ऋणानुबंध 

गोवा ही देवभूमी असून तिथे आपले पाय लागले, यात मोठे भाग्य आहे, असे मानणारे अटलजी गोव्याच्या मातीच्या प्रेमात पडले होते. ते गोव्याच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले होते. गोव्यातील नाटक, भजन कीर्तनादी कार्यक्रमांतही अटलजी सहभागी व्हायचे, असे बुजुर्ग मंडळी सांगतात.

भारत म्हणजे महासत्तांच्या ताटाखालचे मांजर नसून शूरवीरांचे महापराक्रमी राष्ट्र आहे,  अशी भारताची नवी ओळख पोखरणमधील अणुचाचणीद्वारे अवघ्या जगाला करून देणारे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयींसारखा महामानव पुन्हा या देशात जन्माला येईल की नाही, हे सांगता येणार नसले तरी त्यांच्या स्मृती मात्र आगामी पिढय़ा न पिढय़ांमध्ये चिरंतन राहतील. ‘भारत जमीन का टुकडा नही, जीता जागता राष्ट्रपुरुष है।’ अशा शब्दांमध्ये अटलजींनी भारताचा परिचय करून दिला आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान व विश्वासार्ह राजकीय नेता ठरलेल्या अटलजींनी अमेरिकेसारख्या महासत्तेला न जुमानता भारताचे सामर्थ्य विश्वाला दाखवून दिले. आज भारत जगात ताठ मानेने उभा आहे. वक्तृत्व आणि कर्तृत्व यामुळे भारतीयांच्या ह्य्दयामध्ये वसलेल्या अटलजींनी गोव्यावर खूप प्रेम केले. देशभरातील जनतेचे आपल्या भाषणांद्वारे राजकीय, राष्ट्रीय प्रबोधन केले तसेच गोव्यातील लोकांचेही केले किंबहुना त्यांनी गोव्यासारख्या छोटय़ा प्रदेशाकडे अधिक ममत्वाने पाहिले. अटलजी आणि गोव्याचे ऋणानुबंध अतूट होते. त्यांचे अस्थिकलश गोव्यात दाखल झाले असून आज गुरुवार व उद्या शुक्रवारी संपूर्ण गोव्यात कलशयात्रा झाल्यानंतर मांडवी व जुवारी नदीमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. गोव्याच्या कणाकणात अटलजी वास करून राहतील. देशातील जनतेप्रमाणेच गोव्यातील जनताही अटलजींच्या भाषणांवर फिदा झाली होती. अटलजींसारखा राजकीय वक्ता दुसरा झाला नाही. भाषणाचा विषय सिद्धांतांवर आधारलेला, विषय स्पष्टीकरणसाठी उदाहरणादाखल वेद उपनिषदांतील दाखले, स्वानुभवाच्या घटनांचा उल्लेख, मध्ये विनोदांची पेरणी आणि काव्याचा खुबीने वापर अशाप्रकारची अटलजींची संसदेतील व संसदेच्या बाहेरील भाषणे संपूर्ण देशवासियांना भारून टाकणारी होती व आजही आहेत. त्यांची भाषणे ऐकायला मिळणे म्हणजे मोठे भाग्य. गोव्यातील त्यांच्या अनेक सभा गाजल्या. 1994 मध्ये पणजीत श्रीमहालक्ष्मी मंदिराजवळ, 2002 व 2004 मध्ये कांपाल मैदानावर झालेल्या सभांचे ते विराट चित्र अजूनही डोळय़ांच्या पटावरून गेलेले नाही. अटलजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान बनले आणि तेरा दिवसांचे त्यांचे सरकार कोसळले तेव्हा राजीनामा देऊन पंतप्रधान पुन्हा जनादेश मागण्यासाठी जनतेच्या दरबारात गेले तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्व उजळून गेले. सारी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. गोवेकरही त्यांच्या पाठीशी राहिले. नाते अधिक दृढ होत गेले.

ज्या काळात संघ परिवार, भाजपपासून लोक लांब राहत होते, त्या काळात अटलजींमुळे संपूर्ण देशातील जनता भाजपकडे वळत होती. गोव्यातही भाजपच्या जडणघडणीत त्यांचा वाटा सिंहाचा आहे. गोव्यात संघकार्य मजबूत असले तरी भाजप रुजला नव्हता. संघ परिवार हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा मतदार होता. मात्र काळाने वळण घेतले आणि अटलजींचा भाजप गोव्यात सत्ताधारी बनला. संघाने भाजपला दिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग जागविण्याचे काम अटलजींनी मोठय़ा खुबीने केले. मतदारांना भाजप समजावून सांगण्याचा मंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

  गोवा के लोगो ने इतिहास रचा है।

1994 च्या निवडणुकीत 4 आमदार, 1999 मध्ये 10, 2002 मध्ये 17 तर 2012 च्या निवडणुकीत 21 आमदारांच्या बहुमतासह गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यामध्ये ज्यांनी रक्त आटवले त्यामध्ये अटलजी अग्रेसर होते. अटलजींनी दिलेला मंत्र गोव्यातील जनतेने स्वीकारला म्हणूनच महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे भाजपची पहिली सरकारे आल्यानंतर गोव्यातील जनतेने चौथे सरकार दिले होते. तेव्हा अटलजी उद्गारले होते, गोवा के लोगों ने इतिहास रचा है। मोरारजीभाई देसाई यांच्या पंतप्रधानपदाखाली जनता सरकार होते तेव्हा अटलजी विदेश व्यवहारमंत्री होते. तेव्हा गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या आमंत्रणाला मान देऊन अटलजी गोव्यात आले. 7 नोव्हेंबर 1977 रोजी त्यांच्याच शुभहस्ते फर्मागुडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ाचे अनावरण झाले होते. 2002 मध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अटलजींच्या नेतृत्वाखाली गोव्यात झाली आणि अनेक राष्ट्रीय नेत्यांचा सहवास गोव्याला लाभला.

अटलजींचा गोव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण

अटलजींची अभ्यासपूर्ण राष्ट्रभावनेने भारलेली भाषणे गोवेकरांना अंतर्मुख करून सोडत होती. एरव्ही देशभरातील लोक जेव्हा गोव्याकडे पाहतात तेव्हा त्यांना गोवा म्हणजे पूर्वेकडचे रोम असल्याचे वाटते आणि तसाच ते विचार करू लागतात. त्यामध्ये अनेक राजकीय पक्षांच्या बडय़ा नेत्यांचाही समावेश होता, मात्र त्या सर्वांपासून वेगळे होते ते म्हणजे गोवेकरांचे लाडके अटलजी. गोवा ही देवभूमी असून तिथे आपले पाय लागले, यात मोठे भाग्य आहे, असे मानणारे अटलजी गोव्याच्या मातीच्या प्रेमात पडले होते. ते गोव्याच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले होते. गोव्यातील नाटक, भजन कीर्तनादी कार्यक्रमांतही अटलजी सहभागी व्हायचे, असे बुजुर्ग मंडळी सांगतात. अटलजींच्या कवितांवर सारा देश फिदा  असून गोव्यातही त्यांच्या कविता गाजल्या. ‘छोटे मन से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई खडा नही होता… एकापेक्षा एक अजरामर कविता. कविता वाचनाचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांच्या काव्यसंग्रहाचा कोकणीत अनुवादही झाला. गेली काही वर्षे ते राजकारणात सक्रीय नव्हते, तरीही 2014 मध्ये मोदी सरकारने जेव्हा अटलजींना भारतरत्न सन्मान दिला तेव्हा गोव्यातही आनंदाची लाट उफाळून आली होती. मात्र 16 ऑगस्टच्या सायंकाळी अटलजी गेले तेव्हा गोवेकरांमध्ये आपल्या घरातील वडीलमाणूस गेल्याची भावना निर्माण झाली. राजकीय विरोधकांना आणि शत्रू राष्ट्रातील लोकांनाही आपलेसे वाटणाऱया अटलपर्वाचा अस्त झाला, मात्र आता लोकशाहीत बहुमताबरोबरच सर्वमान्यता साधून सर्वसमावेशकतेच्या, नैतिक अधिष्ठानाच्या राजकारणाचा अटलजींचा वारसा पुढे चालविणे हेच सर्व भारतीयांचे कर्तव्य ठरते.

राजू भिकारो नाईक