मत्सर कसा निर्माण होतो?

स्वामी तेजोमयानंदजी पुढे म्हणतात-खऱया अर्थी श्रे÷ भक्त तो की जो दुसऱया भक्ताला आपल्याहून महान मानतो. मी लहान आहे माझी साधना जास्त नाही, त्याची साधना जास्त आहे असे भाव उमटले पाहिजेत. येथे गोपिका अशाच प्रकारचा विचार करीत होत्या. त्या म्हणाल्या-तिने खूप साधना केली असली पाहिजे. तिची भक्ती आमच्यापेक्षा श्रे÷ आहे. म्हणूनच आम्हाला येथे सोडून भगवंत तिच्याबरोबर गेले.
भगवान एका गोपीला सोबत घेऊन अदृश्य झाले आहेत हे लक्षात आल्यावरही त्या भगवंताला शोधणाऱया गोपिकांना तिच्याविषयी जराही ईर्षा किंवा मत्सर वाटला नाही. हे मोठेच आश्चर्य आहे, हे स्वामीजींनी नोंदविलेले सूक्ष्म निरीक्षण महत्त्वाचे आहे. हे समजून घेण्यासाठी आपण मत्सर हा मनोविकार थोडा समजून घेऊ.
अगदी लहानपणीसुद्धा कधी कधी मत्सर हा मनोविकार डोके वर काढताना आपण पाहतो. लता आणि राजन यांना असाच अनुभव आला. रसिका हे या जोडप्याचे पहिले अपत्य. दुसरे मूल जेव्हा जन्माला येते त्यावेळी त्या नवजात बालकाची काळजी घेताना पहिल्या मुलाकडे कित्येक वेळा आई बापाचे दुर्लक्ष होते. नेमके हेच घडले. चंदूचा जन्म झाला. आणि मग आपण ज्या प्रेमाचे खरे हक्कदार आहोत त्याच्यावर आपल्या या नवीन आलेल्या भावंडाचे अतिक्रमण होत आहे, अशी भावना रसिकाच्या मनात निर्माण झाली. याला आधुनिक मानसशास्त्रीय भाषेत सिबलींग रायव्हलरी, भावंडांतील सुप्त वैरत्व म्हणतात. रसिकाला चंदूबद्दल राग येऊ लागला. ती हट्टी आणि चिडचिडी बनली. तिच्या मनात चंदूबद्दल प्रेम नव्हे तर मत्सर निर्माण झाला. दोन भावंडे ही वास्तविक दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे असतात. दोघांच्याही क्षमता, आवडी, निवडी संपूर्णपणे भिन्न असू शकतात. एक मूल अभ्यासात हुशार असेल तर दुसरे उत्तम खेळाडू असू शकेल. पहिल्याला अभ्यासात रस वाटेल तर दुसऱयाला त्याचा कंटाळा येऊ शकेल. एखाद्याला गणित आवडेल तर दुसऱयाला चित्रकलाच आवडत असेल. सचिन तेंडोलकरला लता मंगेशकर सारखे गाता येणार नाही. आणि लताला सचिनसारखे खेळता येणार नाही. पण आई वडीलच आपल्या दोन मुलांची प्रत्येक बाबतीत तुलना करू लागतात. तेव्हा त्या मुलांच्या मनात मत्सर आणि वैरभाव निर्माण होऊ लागतात.
रसिका पौगंडावस्थेत आली. तिला वर्गातील जो स्मार्ट मुलगा आवडू लागला, त्याच्या भोवती इतर सुंदर मुली रुंजी घालू लागल्या की रसिकाच्या मनातील मत्सर पुन्हा डोके वर काढू लागला. गणित हा रसिकाचा आवडता विषय. गणित रसिकाला आवडत होते त्याला मुख्यत्वे नातूबाई कारणीभूत होत्या. किती सुंदर शिकवीत नातूबाई! नववीपर्यंत रसिका नातूबाईंची लाडकी विद्यार्थिनी होती. पण दहावीत अभय वर्गात आला. अभय तसा देखणा आणि हुशारही! रसिकाला तो आवडायचा. पण गणित विषयातही प्रवीण असलेला अभय लवकरच नातूबाईंचा विशेष लाडका विद्यार्थी बनला आणि रसिकाला अभयबद्दल एका बाजूला आकर्षण तर दुसऱया बाजूला मत्सर वाटू लागला.
Ad. देवदत्त परुळेकर