|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विद्यार्थ्यांचा प्रवास रामभरोसे

विद्यार्थ्यांचा प्रवास रामभरोसे 

प्रतिनिधी /फलटण :

शिक्षणासाठी फलटण शहरात येणार्या  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) फलटण आगारातून सवलतीच्या दरातील प्रवास पास दिले जातात मात्र त्या पासाच्या आधारे कोणत्या मार्गावरुन किती विद्यार्थी/विद्यार्थीनी दररोज शहरात येतात याची माहिती असूनही या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा बसेस उपलब्ध करुन दिल्या जात नसल्याने या विद्यार्थी/विद्यार्थीनींची नेहमीच कुचंबना होत आहे. एसटी प्रशासनाने याबाबत योग्य दक्षता घेवून या विद्यार्थी/विद्यार्थीनींसाठी सकाळी शहरात येताना आणि सायंकाळी घराकडे परतताना पुरेशा बसेस उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी पालक व विद्यार्थी वर्गातून होत आहे. 

शहरात येणार्या विद्यार्थी/विद्यार्थीनींची दररोज होणारी कुचंबना आणि त्याकडे एसटी प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे त्रासलेल्या विद्यार्थी/विद्यार्थीनींनी वडले आणि राजाळे येथे विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेता सरळ पुढे जाणार्या बस चालक/वाहकांना आणि एसटी प्रशासनाला विद्यार्थ्यांची होणारी कुचंबना निदर्शनास आणून देण्यासाठी भरधाव वेगात जाणार्या एसटी बसेस रोखून धरुन पुरेशा बसेस उपलब्ध करुन देण्याची तसेच सर्व थांब्यावर बसेस थांबविण्याची मागणी केली आहे. 

 फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे येथील विद्यार्थी-विद्यार्थीनी दररोज सकाळी फलटण येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असतात. फलटण-आसू मार्गावरील आसू, गुणवरे, गोखळी येथून फलटणकडे जाणार्या बसेसमध्ये सुटण्याच्या ठिकाणावरच प्रवासी संख्या प्रचंड असल्याने सर्व बसेस तेथेच पूर्ण भरल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा नसल्याचे कारण देत सदर बसेस राजाळे येथे थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील पहिले एक दोन तासापासून नेहमीच वंचित रहावे लागत असल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.