|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडमध्ये फ्लॅट फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

खेडमध्ये फ्लॅट फोडून साडेसहा लाखांचा ऐवज लंपास 

फ्लॅट बंद असल्याची साधली संधी

पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे?

प्रतिनिधी /खेड

शहरातील डाकबंगला येथील उमर रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून अज्ञात चोरटय़ाने 6 लाख 40 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा ऐवज लांबवल्याची घटना गुरूवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घरफोडीनंतर श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले असून लवकरच चोरीची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अब्दुल रऊफ बद्रुद्दीन खोत यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. त्यांचे चुलत भाऊ अमानउल्ला मोहिद्दीन खोत यांच्या मालकीचा डाकबंगला येथील उमर रेसिडेन्सी येथे फ्लॅट आहे. ते नोकरीनिमित्त कतार येथे वास्तव्यास आहेत. या फ्लॅटमध्ये त्यांची पत्नी व आई राहते. 16 ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी कतार येथे गेली, तर आई नातेवाईकांकडे राहण्यास गेली. फ्लॅट बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरटय़ाने फ्लॅटवर डल्ला मारला.

कपाटातील सोन्याचा किंमती ऐवज अज्ञात चोरटय़ाने लंपास केला. यामध्ये 87 हजार 500 रूपये किंमतीचा सोन्याचा हार, 1 लाखाचा सोन्याचा नेकलेस, 62 हजार 500 रूपये किंमतीच्या दोन सोन्याच्या बांगडय़ा, 37 हजार 500 रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळय़ा, 90 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा हार यासह कानातील रिंगा, पायातील साखळय़ा यांचा समावेश आहे. याबाबतची खबर मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.