|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात 16 आंदोलकांवर गुन्हे

चिपळुणात 16 आंदोलकांवर गुन्हे 

संभाजी भिडेंची सभा उधळण्याच्या प्रयत्नाचा ठपका

गुरूंजीच्या विधानांवर आंदोलकांचे आक्षेप

चित्रिकरण पाहून घेणार प्रशासन निर्णय

 

चिपळूण / प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजींची चिपळुणातील बैठक उधळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरूवारी पोलिसांनी 16 जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, भिडे गुरूजींच्या बैठकीवरून दुसऱया दिवशीही पडसाद उमटत असून भिडे यांनी सभेत वादग्रस्त विधाने केल्याचा आक्षेप विविध संघटनांनी घेतला आहे.

भिडे गुरूजींची सभा रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुभाष संभाजी जाधव (धामणवणे), प्रविण राजाराम जाधव (शिरळ), मुजफ्फर इन्साक मुल्लाजी, विनोद कदम, महेश सावंत, वैभव सावंत (सर्व सावर्डे), संदेश मोहीते (खेर्डी), महेश धोंडीराम सकपाळ (धामणवणे), सुबोध सावंत-देसाई (बहाद्दूरशेख नाका), शक्ती जाधव (धामणवणे), चंद्रकांत काशिराम सावंत, सूरज जाधव (दोघेही चिपळूण), सचिन बाळाराम गमरे (खांदाट), प्रसन्न सुधाकर मोहीते (शिवाजीनगर), शिवानी भोसले, शिवानी संजय चव्हाण (चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बेकायदेशीपणे जमाव करत बैठक उधळवून लावण्याच्या हेतूने प्रयत्न केल्याचा तसेच जाणूनबुजून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप

दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी चिपळुणमधील बैठकीत वादग्रस्त व आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप करत विविध संघटनांनी गुरूवारी तहसील कार्यालयासह पोलीस स्थानकावर धडक देत कारवाई करण्याची मागणी केली. मात्र बैठकीची चित्रफीत पाहूनच कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार जीवन देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहरातील चितळे मंगल कार्यालयात भिडे गुरूजींच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. मात्र, भिडे यांच्याविरोधात आंबेडकरी संघटनांसह चौदा विविध सामाजिक संस्थांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांची बैठक उधळण्याचा प्रयत्न केला. तब्बल 5 तास सभागृहापासून काही अंतरावर त्यांनी निदर्शने केली. मात्र या तणावाच्या वातावरणातही भिडे गुरूजीनी 3 तास प्रदीर्घ मार्गदर्शन केले. बैठक आटोपून परतणाऱया भिडे यांची गाडी रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलीसांनी आंदोलकांना पांगवत भिडे यांना मार्ग मोकळा करून दिला होता. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडल्याचे मानले जात होते.

मात्र, गुरूवार याप्रकरणी आंदोलकांनी पुन्हा आक्रमक भुमिका घेतली. तहसीलदार देसाई यांची भेट घेत भिडे व बैठकीच्या आयोजकांवर कारवाईची मागणी केली. मात्र देसाई यांनी या बैठकीची चित्रफीत तयार करण्यात आली असून ती पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष के. डी. कदम, जिल्हा संघटक प्रशांत मोहिते, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते, भारिपचे कोकण संघटक महेश सावंत, तालुकाध्यक्ष महेश सकपाळ, विनोद कदम, सुभाष मोहीते, सचिन गमरे, चंद्रसेन मोहिते, किसन मोहिते, रमन मोहिते, उमेश सकपाळ, मुझफ्फर सय्यद तसेच संभाजी ब्रिगेड, मुस्लिम सिरत कमिटीचे काही पदाधिकारी उपस्थित होते.

भिडेंकडून बैठकीत वादग्रस्त विधाने- जाधव

या बैठकीत भिडे यांनी विशिष्ट समाजाला अनुषंगून वादग्रस्त विधाने केली आहेत. आमचे काही कार्यकर्ते त्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी ते प्रत्यक्ष ऐकले असून बैठकीच्या चित्रफितीत ते उघड होणार आहे. त्यामुळे भिडे यांच्यासह आयोजकांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

अफवांवर विश्वास ठेऊ नका- पोळ

भिडे यांच्या बैठकीची चित्रफीत पाहून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मात्र या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काहींकडून अफवा पसरवल्या जाण्याची शक्यता आहे. विशेषतः सोशल मिडियाचा त्यासाठी वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

संभाजी भिडेंची मिडियावर आगपाखड

शिवप्रतिष्ठानची बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी संभाजी भिडे यांना भेटून मिडियासमोर बोलण्याच्या आग्रह धरला. यावेळी भिडे यांनी ‘तुम्ही बेकार आहात, गेले तीन महिने वांग्याचं भूत करुन विषय चघळत ठेवलात त्यामुळे चर्चाच काय, तुमचे तोंड पहायचीही माझी इच्छा नाही’ अशा शब्दात त्यांनी माध्यमांवर आगपाखड केली.

ही मोघलाई आहे का?- भिडे

बैठक संपल्यानंतर संभाजी भिडेंना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात तेथून बाहेर काढल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना इनोव्हा गाडीत मागे बसण्याची विनंती केली. मात्र मी पुढच्या सीटवर बसणार, असा आग्रह धरला. अखेर पोलिसांनाही त्यांचे ऐकावे लागले आणि त्यांना पुढल्या सीटवर बसण्यास सांगितले गेले. यावेळी भिडे म्हणाले, मी भित्रा नाही, ही मोगलाई आहे का? मी पुढल्या सीटवरच बसेन असे ठणकावून सांगितले.