|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गणेशोत्सवासाठी एस.टी.च्या 1500 गाडय़ा

गणेशोत्सवासाठी एस.टी.च्या 1500 गाडय़ा 

प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो यांची माहिती

रत्नागिरी विभागीय बैठकीत घेतला आढावा

चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी खबरदारीचे आवाहन

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाचा मानल्या जाणाऱया गणेशोत्सवासाठी एस. टी. प्रशासनही सज्ज झाले आहे. चाकरमान्यांचा कोकणातील प्रवास सुकर होण्यासाठी मुंबईतून 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान 2225 गाडय़ा कोकणात दाखल होणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागाकडून तब्बल 1500 गाडय़ा सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिली. उत्सवादरम्यान चाकरमान्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परतीच्या गाडय़ा व इतर नियोजनासाठी एस.टी.महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो यांनी सर्व आगारव्यवस्थापक व विभागीय वरिष्ठ अधिकाऱयांची दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. यावेळी एस.टी.विभाग नियंत्रक अनिल मेहत्तर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात महामार्गावर होणारी गर्दी पाहता चाकरमान्यांचा सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व चालक-वाहकांना योग्य त्या सूचना सर्व आगारव्यवस्थापकांनी कराव्यात. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात ठेवता उत्तम नियोजन करावे, आयत्यावेळी आलेले ग्रुप बुकींगलाही बस उपलब्ध करून द्यावी अशा सूचना तोरो यांनी यावेळी दिल्या.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तीन जिल्हय़ांत मुंबईहून 2225 गाडय़ा चाकरमान्यांना घेवून दाखल होणार आहेत. सर्वाधिक 1500 गाडय़ा रत्नागिरीत दाखल होणार आहेत. 11 सप्टेंबरला सर्वाधिक चाकरमानी रत्नागिरी दाखल होतील त्यामुळे जिल्हय़ातील गावांमध्ये सोडण्यात येणाऱया बसेसच्या फेऱया वाढविण्यात येणार आहे. तसेच शहरी बसेसची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनिल मेहत्तर यांनी या बैठकीत दिली.

17 सप्टेंबरपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असून त्याचे ऑनलाईन बुकींगही सुरू झाले आहे. आता जवळपास 50 टक्के चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाचे आरक्षणही केल्याची माहिती रत्नागिरी विभागाकडून यावेळी देण्यात आली. परतीच्या प्रवासासाठी गतवर्षी 1414 गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या यावर्षी या गाडय़ांमध्ये वाढ करण्यात आली असून 1500 गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात महत्वाच्या ठिकाणी रत्नागिरी एस.टी.विभागाकडून नियंत्रण कक्ष उभे करण्यात येणार असल्याचे तोरो यांनी सांगितले.

स्वच्छतेवर भर हवा

केवळ प्रवाशांना सेवा देणे आपले काम नाही तर बसेस स्वच्छ आणि नीटनीटके ठेवणेही आपली जबाबदारी आहे. या स्वच्छतेकडे अधिक लक्ष ठेवण्यात यावे अशा सूचनाही राहुल तोरो यांनी अधिकाऱयांना केल्या आहेत. रेल्वेस्टेशनच्या शहरी बससेवाही वाढविण्यात येणार असून ग्रामीण भागात जाणारे लांब पल्ल्याचे बसेस स्टेशनवरून जाणार आहेत.