|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण रेल्वे भरती निकालासाठी आणखी 15 दिवस लागणार

कोकण रेल्वे भरती निकालासाठी आणखी 15 दिवस लागणार 

प्रत्येक उमेदवाराला उत्तर पत्रिका इ-मेलद्वारे, सर्वांच्या सूचना, आक्षेप ऐकले जाणार

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी झालेल्या परीक्षांचे निकाल लागण्यास आणखी किमान 15 दिवस लागतील अशी माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर यांनी दिली.

ते म्हणाले, 4 व 5 जुलैला कोकण रेल्वेने भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा घेतली. मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रे होती. परीक्षा दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला इमेलद्वारे आदर्श उत्तरपत्रिका आणि उमेदवाराने लिहिलेली उत्तरपत्रिका असे दोन दस्तऐवज पाठवण्यात आले आहेत. या दस्तऐवजांवर उमेदवारांचे काही आक्षेप, सूचना असतील तर त्या मागवण्यात आल्या आहेत.

अनेक उमेदवारांनी आपल्या सूचना आमच्यापर्यंत पाठवल्या आहेत. या सूचना संबंधित परीक्षकांकडे पाठवण्यात आल्या आहेत. परीक्षकांचे अभिप्राय आणि अंतिम निर्णयानंतर या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. प्रथमच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर उमेदवारांना आदर्श उत्तरपत्रिका व उमेदवारांनी लिहिलेली उत्तरे पाठवण्यात आली. उमेदवारांच्या सूचनांवर निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. कोणतीही सूचना अदखलपात्र समजण्यात येणार नाही. या सर्व प्रक्रियेला आवश्यक वेळ मिळणे गरजेचे आहे. या परीक्षेमध्ये प्रकल्पग्रस्तांना सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे, असेही ते म्हणाले.

परीक्षेला एकूण 40 हजार उमेदवार कोकण रेल्वे भरतीसाठी बसले. होते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधून त्यापैकी 7400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. स्टेशन मास्टर, गुड्स गार्डस्, अकाऊंट्स असिस्टंट, सिनिअर क्लार्क आदी एकूण 124 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्याचा निकाल येण्यासाठी आणखी किमान 15 दिवस लागणार असल्याचे गिरीष करंदीकर यांनी सांगितले.