|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लाच स्विकारताना नगर परिषद कर्मचाऱयाला अटक

लाच स्विकारताना नगर परिषद कर्मचाऱयाला अटक 

लाचलुचपत विभागाची कारवाई

12 हजाराची लाच स्विकारताना ताब्यात

‘व्यवहारा’त तरबेज असल्याने वरिष्टांची मर्जी

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱयाला 5 हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आनंदा नानासो थोरात (48) असे या कर्मचाऱयाचे नाव आह़े शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मारूती मंदिर येथे एका हॉटेलसमोर सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल़ी

आनंदा थोरात हा नगर परिषदेच्या बांधकाम विभागात मेस्त्री या पदावर कार्यरत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार तो आवक जावक लिपीक व इतर कार्यालयीन कामे देखील करत़ो थोरात याने शहरातील सीआरझेड मध्ये येणाऱया घराच्या परवानगीसाठी 12 हजार रूपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे 16 ऑगस्ट रोजी करण्यात आली होत़ी

आनंदा थोरातने गुरूवारी तक्रारदाराकडे घराचा प्रस्ताव लवकरात लवकर पुढे पाठविण्यासाठी 5 हजार रूपये तात्काळ देण्याची मागणी केल़ी ही मागणी मान्य असल्याचे सांगून त्यांनी तक्रार केली व त्यानंतर सापळा रचण्यात आला होत़ा यानुसार थोरात याला शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मारूती मंदिर परिसरातील गोपाळ हॉटेल येथे पैसे नेण्यासाठी बोलविण्यात आल़े ठरल्याप्रमाणे थोरात पैसे घेण्यासाठी आला. गोपाळ हॉटेलच्यासमोरच्या मोकळ्या जागेत 5 हजार रूपये स्विकारताना त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आल़े

थोरात काही वर्षापूर्वी घरपट्टी गोळा करण्याचे काम करत होत़ा मात्र त्याठिकाणी अफरातफर केल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होत़ी यानंतर पुन्हा त्याला सेवेत घेण्यात आले व बांधकाम विभागाशी संबंधित कामे तो वरिष्ठांच्या आदेशानुसार करत होत़ा बांधकाम विभागातील ‘आर्थिक व्यवहार’ थोरात उत्तम प्रकारे करत असल्याने या विभागातील वरिष्ठांची त्याच्यावर खास मर्जी असल्याचे बोलले जात़े

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रानमाळे, पोलीस निरिक्षक तळेकर, कदम, पोलीस हवालदार संदिप ओगले, संतोष कोळेकर, प्रदिप सुपल, विशाल नलावडे, चालक सुरज राणे यांनी केल़ी

रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागात बांधकामांची परवानगी मिळविण्यासाठी विविध दर ठेवण्यात आहेत़ अशा वेळी या घडलेल्या लाच प्रकरणानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आलेले आह़े यामध्ये आणखीन काहींचा गोतावळा सहभागी तर नाही ना अशीही चर्चा सुरू झाली आह़े