|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मेट्रो-3 रात्रीच्या कामावरील स्थगिती उठवली

मेट्रो-3 रात्रीच्या कामावरील स्थगिती उठवली 

खोदकामात ध्वनीप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश

मुंबई / प्रतिनिधी

मेट्रो-3 या बहुप्रतिक्षित प्रकल्पामध्ये ध्वनीप्रदुषणाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणीदरम्यान एमएमआरसीएल मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत मागील नऊ महिन्यांपासून रात्रीच्या कामावरील स्थगिती न्यायालयाने उठवली.

डिसेंबर 2017 मध्ये ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर दक्षिण मुंबईत रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे अंधेरी-सीप्झ ते कुलाबा या मेट्रो-3 प्रकल्पाच्या कफ परेड भागात दिवसरात्र काम करण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने (एमएमआरसीएल) आपला अर्ज दाखल केला आहे, त्या अर्जावर स्थानिक रहिवासी रॉबीन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला होता. सदर याचिकेवर प्रभारी मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, मेट्रोच्या कामामुळे होणाऱया आवाजाची पातळी कमी करण्यासाठी ‘निरी’ यासंस्थेने सादर केलेल्या अहवालात नॉईस बॅरिअरचा उपाय सुचवला असून मेट्रोच्या कामामुळे दिवसाला 68.5 ते 91.9 डेसिबल इतके ध्वनीप्रदूषण होते तर रात्रीच्या वेळी 60.3 ते 83.4 डेसिबल इतके ध्वनीप्रदूषण असल्याची माहिती  अहवालात देण्यात आली. दुसरीकडे खोदकाम करताना भूगर्भातून निघणारी माती एमएमआरडीएकडून रात्रीच्या वेळेस मातीत वाहून नेण्यात येणार आहे. जेणे करुन याभागात वाहतूककोंडीची समस्या उद्भवणार नाही, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी खंडपीठाला दिली. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करूनच खंडपीठाने रात्रीच्या कामाला परवानगी देत राज्य सरकार आणि एमएमआरसीएलला दिलासा दिला. मात्र, खोदकाम करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यासाठी निरीने सुचविलेल्या शिफारसींची काटेकोर अंमलबजावणी करा, असे आदेश एमएमआरसीएलला दिले. तसेच, ध्वनीप्रदूषण होत असल्यास लोकांना त्याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी तत्काळ यंत्रणा उभारण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले.