|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » स्टार्टअपसाठी देशातील सर्वात मोठे केंद्र राजस्थानात

स्टार्टअपसाठी देशातील सर्वात मोठे केंद्र राजस्थानात 

700 कंपन्यांना एकत्र काम करण्याची संधी  सरकारकडून अनेक सुविधा मिळणार मोफत

वृत्तसंस्था/ जयपूर

राजस्थानात नवउद्यमींची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यातील कोटा, उदयपूर आणि जयपूर आदी शहरांत तंत्रज्ञान हबची निर्मिती करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रनंतर राजस्थानचा क्रमांक लागतो. या योजनेत उभरत्या कंपन्या, नवउद्योजकांसाठी राज्य सरकारकडून विविध प्रकारची मदत करण्यात येत आहे. देशात आयटी क्षेत्रातील स्पर्धेत राजस्थान सहभागी झाला असून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जयपूरमधील भामाशाह टेक्नो हब या देशातील सर्वात मोठे सहाय्य केंद्राचे उद्घाटन केले. या ठिकाणी स्टार्टअप कंपन्यांना आवश्यक असणारी मदत करण्यात येईल.

1 लाख चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्रात पसरलेले तंत्रज्ञान केंद्र हा देशातील सर्वात मोठा सहाय्य कक्ष उभारण्यात आला. या एकाच छताखाली 700 स्टार्टअप कंपन्या कार्यरत असतील. स्टार्टअप क्षेत्रात नावीन्यता आणि भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येतील. या ठिकाणी असणाऱया स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, निधी, दळणवळण, कार्यालय जागा अशा सुविधा मोफत पुरविल्या जातील. यामुळे परराज्यातील स्टार्टअप कंपन्या राजस्थानात येतील आणि अन्य राज्ये या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतील असे सांगण्यात आले.

राजस्थान सरकारच्या आयस्टार्ट उपक्रमांतर्गत कोटा, उदयपूर, जयपूरमधील 1 हजारपेक्षा अधिक कंपन्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  सिस्को नेटवर्किंग ऍकॅडमी, आयबीएम ऍकॅडमी, एचपी ऍकॅडमी, इन्फोसिस कॅम्पस कनेक्ट, ओरॅकल वर्कफोर्स अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर भांडवल पुरवठय़ासाठी सरकारने भागीदारी केली.