|Saturday, November 17, 2018
You are here: Home » क्रिडा » सौरव घोषाल, जोश्ना उपांत्य फेरीत

सौरव घोषाल, जोश्ना उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ जकार्ता

आशियाई स्पर्धेत भारताचे स्टार स्क्वॅशपटू सौरव घोषाल, जोश्ना चिनप्पा, दीपिका पल्लीकल यांनी शानदार विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सौरव घोषाल, दीपिका पल्लीकल व जोश्नाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशामुळे स्क्वॅशमध्ये भारताची तीन पदके निश्चित झाली आहेत.

शुक्रवारी पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सौरव घोषालने मायदेशी सहकारी हरिंदरपाल संधूला 3-1 अशी मात दिली. आता, उपांत्य फेरीत सौरवसमोर हाँगकाँगच्या चुन मिंगचे आव्हान असेल. याशिवाय, महिला एकेरीतील उपांत्यपूर्व  सामन्यात दीपिका पल्लीकलने जपानच्या कोबायाशी मिसाकीचा 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. तर जोश्ना चिनप्पानेदेखील शानदार विजय मिळवताना हाँगकाँगच्या चेन लिंगचा 3-1 असा पराभव केला.

 

बॅडमिंटनमध्ये श्रीकांत, प्रणॉयचे पॅकअप

आशियाई स्पर्धेत पुरुष बॅडमिंटनमध्ये भारताला जोरदार धक्का बसला. एकेरीत स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत व एचएस प्रणॉयचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. सलामीच्या लढतीत श्रीकांतला हाँगकाँगच्या नवख्या वोंग विंगने 23-21, 21-19 असे नमवले. तर प्रणॉयला थायलंडच्या केंटपॉनने 21-12, 15-21, 21-15 असे नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.

महिला दुहेरीत मात्र भारताच्या अश्विनी पोनप्पा व एन सिक्की रेड्डी जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने प्रतिस्पर्धी मलेशियन चोऊ-ली मेई जोडीवर 21-17, 16-21, 21-19 असा विजय मिळवला.

 

तिरंदाजीतही भारताची निराशा

शुक्रवारी तिरंदाजीतील मिश्र रिकर्व्ह प्रकारात भारताच्या दीपिका कुमारी-अटानू दास जोडीचा बिशेंडी-ओटोनगोल्ड या मंगोलियन जोडीने 5-4 असा पराभव केला. तसेच कम्पाऊंडमध्ये मिश्र प्रकारात इराणने भारताला 155-153 अशा फरकाने नमवले. भारताच्या ज्योती सुरेखा व अभिषेक वर्मा यांनी इराकवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत त्यांना इराणविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही.

Related posts: