|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » सांघिक नौकानयनात भारताला सुवर्ण

सांघिक नौकानयनात भारताला सुवर्ण 

18 वी आशियाई स्पर्धा : नौकानयनात 1 सुवर्णासह 2 कांस्यपदकाची कमाई

वृत्तसंस्था/ जकार्ता

आशियाई स्पर्धेत सहावा दिवस भारतासाठी सोनियाचा ठरला. शुक्रवारी भारताने दोन सुवर्णासह, एक रौप्य व तीन कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या नौकानयनपटूंनी सांघिक प्रकारात धडाकेबाज कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले. याशिवाय, लाईवेट सिंगल्स स्कल्समध्ये दुष्यंत चौहान तर लाईवेट डबल्समध्ये भगवान सिंग व रोहित कुमार यांनी कांस्यपदक पटकावले. सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात 6 सुवर्णासह, 5 रौप्य व 14 कांस्यपदकासह एकूण 24 पदकांचा समावेश आहे.

सांघिक प्रकारात भारताच्या दत्तू भोकनाळ, ओम प्रकाश, स्वर्ण सिंग व सुखमीत सिंग यांनी शानदार कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीतही भारतीय संघाने 6:17:13 अशी आश्वासक वेळ नोंदवत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्राच्या दत्तू भोकनाळला पदक मिळवण्यात अपयश आले होते. याशिवाय, स्वर्ण सिंग व ओम प्रकाश यांना देखील पदकाने हुलकावाणी दिली होती. मात्र, शुक्रवारी मागील अपयश मागे टाकत सांघिक प्रकारात भारताला सुवर्णयश मिळवून दिले. याशिवाय, इंडोनेशियन संघाला रौप्य तर थायलंडला कांस्यपदक मिळाले.

नौकानयनात आणखी दोन कांस्य

शुक्रवारी सकाळी रोहित कुमार व भगवान सिंग यांनी डबल्स स्कल्समध्ये 7 मिनिटे 4.61 सेंकदाची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. या प्रकारात जपानच्या मायायुकी व मासाहिरो जोडीने सुवर्ण तर दक्षिण कोरियाच्या किम बी व ली मिन्हुक जोडीने रौप्यपदक पटकावले.

तसेच, पुरुषांच्या लाईटवेट सिंगल्स स्कल्समध्ये दुष्यंत चौहानने भारताला नौकानयनातील दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. शर्यतीतील शेवटच्या 500 मीटरमध्ये दुष्यंतला प्रचंड थकवा आला होता. शर्यत संपल्यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन नेण्यात आले. त्याने 7 मिनिटे 18.16 सेंकद अशी वेळ नोंदवली. या प्रकारात दक्षिण कोरियाने सुवर्ण तर हाँगकाँगने रौप्य मिळवले.

नौकानयनच्या इतिहासातील भारताचे दुसरे सुवर्ण

शुक्रवारी दत्तू भोकनाळ, ओम प्रकाश, स्वर्ण सिंग व सुखमीत सिंग यांनी सांघिक प्रकारात शानदार कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, भारताच्या नौकानयनच्या इतिहासातील दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी, चीनमध्ये 2010 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत बजरंगलाल ठक्करने सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, यंदाच्या स्पर्धेत भारताने 1 सुवर्णासह दोन कांस्यपदके मिळवत आपला धडाका दाखवून दिला आहे.

Related posts: