|Friday, April 19, 2019
You are here: Home » क्रिडा » दीपाला पाचवे स्थान, मनोज कुमारची आगेकूच,

दीपाला पाचवे स्थान, मनोज कुमारची आगेकूच, 

गौरव सोळंकी पराभूत, हँडबॉलमध्ये भारताचा दुसरा विजय

वृत्तसंस्था/ जकार्ता

आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अन्य क्रीडाप्रकारापैकी जिम्नॅस्टिक्समध्ये भारताच्या दीपा कमांकरला पाचवे स्थान मिळाले तर मुष्टियुद्धमध्ये अनुभवी मनोज कुमारने 69 किलो गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. मात्र राष्ट्रकुल सुवर्णजेत्या गौरव सोळंकीचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

दीपाने महिलांच्या बॅलन्स बीम अंतिम फेरीत 12.500 गुण घेत पाचवे स्थान मिळविल्याने तिला पदक मिळू शकले नाही. आठ महिलांचा सहभाग असलेल्या या फेरीत पात्रतेमध्ये दीपाने पाचवेच स्थान मिळविले होते. पण त्यावेळी तिने 12.750 गुण मिळविले होते. चीनच्या चेन यिलेने 14.600 गुणांसह सुवर्ण, उत्तर कोरियाच्या किम जाँग सु ने (13.400) रौप्य, चीनच्या झँग जिनने (13.325) कांस्यपदक मिळविले. दीपा पूर्ण फिट नसतानाही तिने चांगले प्रदर्शन केले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिने साघिक अंतिम फेरीतून याआधीच माघार घेतली होती. चार पुरुष जिम्नॅस्ट्सना मात्र अंतिम फेरीही गाठता आली नाही.

69 किलो गटाच्या मुष्टियुद्ध लढतीत मनोज कुमारने आगेकूच करताना भुतानच्या सांगय वांगडीचा 5-0 असा पराभव केला. त्याची पुढील लढत किर्गिजस्तानच्या अब्दुरखमन अब्दुरखमानोव्हशी होणार आहे. 21 वषीय गौरव सोळंकीला मात्र 52 किलो गटाच्या लढतीत जपानच्या रायोमेई तनाकाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत दुसऱया फेरीतच गौरव थकल्याचे दिसून येत होते. याशिवाय त्याच्या ठिसुळ बचावाचा लाभही तनाकाने उठविला.

भारताची पाकवर मात

पुरुषांच्या हँडबॉलमध्ये भारतीय संघाने चुरशीच्या लढतीत पाकिस्तानचा 28-27 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळविला. मध्यंतराला भारताने 14-12 अशी आघाडी घेतली होती. भारताच्या ग्रीनिज डीकुन्हाने 9 तर आदित्य नागराजने 6 गोल केले. याशिवाय नवीन पुनियाने 4, करमजीत सिंगने 4, हरेंदर सिंगने 3, अविन खाटकर व दीपक अहलावत यांनी एकेक गोल नोंदवले. गोलरक्षक अतुलने 11 गोल वाचवून विजयात मोलाची कामगिरी केली. याआधी भारताने मलेशियाचा 45-19 गोलांनी पराभव केला होता. मागील वेळी भारताने या क्रीडा प्रकारात 14 वे स्थान मिळविले होते.

वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे खराब प्रदर्शन पुढे चालूच राहिले. शुक्रवारी महिलांच्या 63 किलो गटात राखी हलदरला एकही लिफ्ट उचलता आली नाही. स्नॅचमध्ये 93 किलो वजन तीनही प्रयत्नात तिला उचलता आले नाही. राष्ट्रीय स्पर्धेत तिने 230 (102+128) किलो वजन उचलत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. उत्तर कोरियाच्या हय़ो सिम किमने (230) सुवर्ण, तिचीच देशवासी हय़ो सिम चोने (238) रौप्य, थायलंडच्या रत्तनवान वामालुनने (225) कांस्य मिळविले. गुरुवारी अजय सिंग व सतीश शिवलिंगम यांनी पाचवे व दहावे स्थान मिळविले होते.

पेनकॅक सिलाट या क्रीडाप्रकारात भारताच्या एन. बोयनाव सिंगला उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. पुरुषांच्या 50-55 किलो गटात त्याला फिलिपिन्सच्या दुमान दिनेसने 5-0 असे हरविले. दुमानने याआधी तुरतबेक सुलेमानकुलचा पराभव केला होता.

Related posts: