|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डोक्यात दगड घालून रखवालदाराचा खून

डोक्यात दगड घालून रखवालदाराचा खून 

सांडगेवाडीतील भंगार दुकानासमोर घटना

प्रतिनिधी/ पलूस

सांडगेवाडी हद्दीतील भंगार दुकानाच्या रखवालदाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या पूर्वी घडली. या घटनेचे वृत पलूस व परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे. विठ्ठल जगन्नाथ शिंदे (50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिंदे हे गेल्या पंधरावर्षाहून अधिक काळ घरी न जाता बाहेर मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. याबाबत त्यांची पत्नी रूक्मिणी विठ्ठल शिंदे यांनी पलूस पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.

शिंदे हे पलूस येथील परमणे हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस राहत होते. सुमारे पंधरा वर्षाहून अधिककाळ ते घरातून बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिंदे हे पलूस-तासगाव महामार्गावर असणाऱया हॉटेल हौसाई बाजूस असणाऱया मुजावर यांच्या भंगार दुकानात रखवालदार म्हणून ते काम करीत होते. मालक मुजावरच त्यांना जेवणाचा डबा देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. घटनास्थळावर शिंदे यांच्या डोक्यात व चेहऱयावर अज्ञाताने दगडाने ठेचून वर्मी घाव घातले आहेत. त्यांच्या डाव्या बाजूच्या डोळय़ावर, कपाळावर तसेच डोक्यात खोल जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावर रक्ताने माखलेले दोन दगड, दारूच्या बाटल्या, चप्पल, टोपी यासह अन्य वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

घटनास्थळावर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली. त्याठिकाणी जहाँगीर मुजावर यांच्या दुकानाच्या बाहेरील बाजूस शेड आहे तर पाठीमागील बाजूस भंगार रचलेले आहे. याचीच राखण करण्याचे काम शिंदे हे करीत असतात. रात्री शिंदे यांनी डब्यात आलेले जेवण केले आहे. त्यानंतरच्या वेळेत खुनाचा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावर अज्ञात व्यक्तीने शिंदे यांच्यावर सिमेंटच्या दगडाने हल्ला केला त्यानंतर शिंदे जमिनीवर कोसळले. त्यांना दुकानाच्या बाजूस ओढत नेवून दुसऱया दगडाने त्यांच्यावर हल्ला चढवला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरील रक्ताने माखलेले दोन्ही दगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सांगलीच्या ठसे तज्ञांनी भेट देऊन तेथे पडलेल्या वस्तूंचे ठसे घेण्यात आले आहेत. दुपारी पलूसमध्ये श्वान दाखल झाले. श्वानास घटनास्थळावर पडलेल्या वस्तूचा वास दिल्यानंतर श्वानाने घटनास्थळापासून तीनशे मीटर अंतर असलेल्या मीनाक्षी चित्रपटगृहापर्यंत माग दाखवला व तिथे घुटमळले. दरम्यान, रस्त्याच्या बाजूस असणाऱया सीसीटिव्हीचे फुटेज घेऊन तपास यंत्रणेस गती देण्यासाचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

शिंदे यांचे पूर्वी चप्पलचे दुकान होते. ते बंद असते. तर मुलाचे आठवडी बाजारात पाटील टॉवर शेजारी पंक्चरचे दुकान आहे. मुलाचा व मुलीचा विवाह झाला आहे. शिंदे यांचे सुमारे पंधरा वर्षाहून अधिक काळ घरी येणे-जाणे नसल्याने ही घटना समजल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला. त्यांची पत्नी रूक्मिणी शिंदे यांनी पलूस पोलिसात वर्दी दिली आहे. अधिक तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील करीत आहेत.