|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » इनामी जमिनीसाठी गुरव समाजाने फुंकल्या तुतारी

इनामी जमिनीसाठी गुरव समाजाने फुंकल्या तुतारी 

क्रांतीची पेटवली मशाल, गुरव समाजाचे प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/ सातारा

इनाम वर्ग 3 जमिनीबाबत प्रशासनाकडून काहीच निर्णय घेतला जात नाही. शासनाकडून सातत्याने गुरव समाजावर अन्याय होत आहे. त्यांच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्हा गुरव समाज संघटनेने तुतारी फुंकून निषेध नोंदवला. क्रांतीची मशाल मोर्चाद्वारे आणण्यात आली होती. शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना सादर करुन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनात अध्यक्ष नंदकुमार गुरव, अरविंद पांबरे, शिवाजी गुरव, संतेंष पवार, दत्तोबा शिर्के, भालचंद्र गोडबोले, शांता गुरव, वैशाली गुरव, मंगल गुरव,  शारदा इंजेकर, सुरक्षा साखरे, संगीता कोकीळ, ज्ञानेश्वर गजधरणे, बाबूराव गुरव, मधूकर गुरव, महेंद्र रणवरे, विजय पोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. नंदकुमार गुरव म्हणाले, इनाम वर्ग 3 या जमीनी या केवळ देवाची पूजाअर्चा व गाभारा देखभाल या कामासाठी देण्यात आली आहे. पूर्वी राजेरजवाडे यांनी त्याप्रमाणे सनद, ताम्रपट देवून गुरव समाजाला हक्क प्राप्त केले आहेत. असे असताना त्या जमिनीवर मोठया प्रमाणात इतर पुढारी याचा शिरकाव करुन अनाधिकृत हस्तांतरण केले आहे. अजूनही होत आहे. तसेच इनाम वर्ग 3 च्या जमिनीवर वहिवाटदारांची नावे लावण्याबाबत शासन उदासिन दिसते आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रक काढुन काहीच निर्णय होत नाही. इनाम वर्ग 3 च्या जमिनी इंडोमेंटट्रस्टवर वारसांची नावे त्वरीत दाखल व्हावीत, गावांनी देवस्थानची स्कीम करुन गुरवांना मंदिरातून हाकललेबाबत, मंदिर अधिगृहण कायदा रद्द करण्यात यावा, आदी मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मोर्चाची सुरुवात शाहु चौकातून

गुरव समाजाच्यावतीने काढण्यात आलेला मशाल मोर्चाची सुरवात शाहु चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन करुन झाली. मोर्चाच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, हमारी मागे पुरी करो, भाजपा सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा या मोर्चात देण्यात आल्या.तसेच आपल्या मागण्यांचे फलकही हाती धरले होते.