|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ढाकणीत वाळू तस्करांचा धुमाकूळ

ढाकणीत वाळू तस्करांचा धुमाकूळ 

जयराम शिंदे / दहिवडी

माण तालुक्यातील ढाकणी गावात वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून येथे भरदिवसा अवैध वाळू उपसा केला जात आहे. वाळू तस्कर महसुलच्या स्थानिक कर्मचाऱयांच्या ‘अर्थपुर्ण’ संबंधामुळे राजरोसपणे वाळुवर डल्ला मारत असल्याची चर्चा असून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व भरारी पथक कारवाया करत असताना स्थानिक कर्मचारी गंधारीची भूमिका का घेतात?, त्यांना कारवाईचे अधिकार नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. जिल्हाधिकाऱयांनी अवैध उत्खनन झालेल्या ठिकाणचे पंचनामे करून संबंधित कर्मचाऱयांवर निलंबना सारखी कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होत आहे.

वाळू उपसा होत असताना

तलाठी व मंडलाधिकारी गप्प का ?

ढाकणी येथील ओढय़ातून अवैधरित्या मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा सुरू असून रात्रभर तर दिवसाढवळ्या ही जणू प्रशासनाने परवाना दिल्यासारखा हा प्रकार सुरु आहे. गावाच्या पश्चिमेकडील बाजूस मोठय़ा प्रमाणात ओढय़ातील वाळुचा उपसा आसपासच्या गावातील वाळू तस्कर महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना हाताशी धरून हे धाडस करीत आहेत. लॅडो तलाठी म्हणून असलेला अनधिकृत कॅन्डिडेट तस्करांकडून मलिदा गोळा करत असून हा मलिदा नक्की कोनाकोणापर्यंत पोहचतो? असा सवाल उपस्थित होत आहे. तीन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी संबंधितांचे कान टोचताच अवैध वाळू डेपोचा पंचनामा केला. मात्र वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. तलाठी गावात फिरकत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी असून कारभार कॅन्डिडेटच पाहतो, त्यामुळे तलाठय़ांकडून उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार आहे का?, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा होत असताना तलाठी व मंडलाधिकारी गप्प का ?, तलाठय़ांनी आजपर्यंत वाहनांवर कारवाई का केली नाही? असे अनेक सवाल जनतेमधून उपस्थित होत आहेत.