|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकसभेसाठी पेडण्यातून खलप व जितेंद्र देशप्रभू यांनी शिंग फुंकले

लोकसभेसाठी पेडण्यातून खलप व जितेंद्र देशप्रभू यांनी शिंग फुंकले 

प्रतिनिधी/ पेडणे

लोकसभेची निवडणूक 2019 साली होणार असल्याने उत्तर गोव्यातून तब्बल चारवेळा भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय कायदेमंत्री रमाकांत खलप व पेडणेचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू हे दोघेही इच्छुक असून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार 25 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जितेंद्र देशप्रभू यांच्या राजमहालात पेडणे येथे आयोजित केली आहे.

उत्तर गोव्यातून मागच्या तीन-चार निवडणुकीत भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा चाळीस हजारापेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांनी श्रीपाद नाईक यांना घाम काढला होता. केवळ 6513 मतांनी जितेंद्र देशप्रभू यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू असून लोकसभेच्या निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी आता सर्वांत प्रथम पेडणे तालुक्यातून काँग्रेसतर्फे मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे.

माजी आमदार जितेंद्र देशप्रभू लोकसभा निवडणुकीसंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितले की 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीपाद नाईक यांना घाम काढला होता. केवळ 6513 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. उत्तर गोव्यातील कार्यकर्ते आजही आपल्या संपर्कात आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करीत आहेत. आपण इच्छुक आहे. जर उमेदवारी पक्षांनी देऊन सर्व नेते एकसंध होऊन काम करायला तयार आहेत. तर आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे देशप्रभू यांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक शनिवार 26 रोजी आपल्या निवासस्थानी आयोजित केली असून त्यावेळी योग्य निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रमाकांत खलप

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्याशी संपर्क साधला असता आपण आपल्या मनातील इच्छा यापूर्वी 4 ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढवणार असून आपणास उमेदवारी मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.

देशप्रभू यांच्या राजवाडय़ात 26 रोजी होणारी बैठक महत्त्वाची मानली जात असून या बैठकीवर सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related posts: