|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिक्षकासाठी पिसुर्लेवासियांचा भागशिक्षणाधिकाऱयांना घेराव

शिक्षकासाठी पिसुर्लेवासियांचा भागशिक्षणाधिकाऱयांना घेराव 

त्वरित शिक्षकाची नियुक्ती करावी, दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/ वाळपई

पिसुर्ले सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेवर तीव्र संताप व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी वाळपई भाग शिक्षण अधिकाऱयांना घेराव घालून जाब विचारला. सदर प्राथमिक शाळेत आवश्यक शिक्षकांची नियुक्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पालकांनी दिला.

पिसुर्ले प्राथमिक शाळेत एकूण 50 मुले शिक्षण घेत असून चार वर्ग आहेत. या ठिकाणी तीन शिक्षक वर्ग कार्यरत असून दोन कायमस्वरुपी तर एक शिक्षक हंगामी तत्वावर काम करीत आहे. दोन शिक्षकांपैकी एकाला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. सध्या एकच शिक्षक चार वर्ग सांभाळत आहे. एक शिक्षिका इंग्रजीचे शिक्षण देत असून ती फक्त आठवडय़ातून तीन दिवस येत असते.

गेल्या काही महिन्यापासून पालकांनी येथे कायमस्वरुपी इंग्रजी शिक्षक नेमावा अशी मागणी करूनही त्याकडे संबंधितांनी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी  पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवा च्यारी यांच्या नेतृत्वाखाली वाळपई भाग शिक्षणाधिकाऱयांना घेराव घालून जाब विचारला.

सध्या तालुक्यात सरकारी प्राथमिक शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत तसेच पिसुर्ले सारख्या भागात 50 मुले शिक्षण घेत असताना शिक्षण खाते याकडे दुर्लक्ष करीत असेल तर शाळेच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली. यामुळे इंग्रजी शिक्षण देणाऱया शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली.

खात्याकडे प्रस्ताव पाठवणार : शिक्षणाधिकारी

याबाबतचा प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठविण्यात येणार असून सदर शाळेत कायमस्वरुपी इंग्रजी शिक्षकाची नियुक्ती व्हावी यासाठी आपण गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे आश्वासन यावेळी शिक्षण अधिकाऱयांनी पालकांना दिले. शिक्षकाची लवकरात लवकर नियुक्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला.

निवेदनाला खात्याकडून केराची टोपली : शिवा च्यारी

अनेकवेळा शिक्षण खात्याकडे पालकांच्या सहय़ांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र त्याला खात्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यामुळे मुलांना शैक्षणिक स्तरावर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या अनेक ठिकाणी पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद पडल्या असून याला शिक्षण खाते जबाबदार असल्याचा आरोप पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवा च्यारी व इतरांनी केला.